मुंबई
Dhvani Bhanushali बॉलिवूडच्या संगीतविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय गायिका ध्वनी भानुशाली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आपल्या मधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ध्वनीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत साखरपुड्याची बातमी जाहीर केली आहे. तिचा बॉयफ्रेंड यश भानुशाली याने अत्यंत रोमँटिक अंदाजात तिला लग्नाची मागणी घातली. या खास क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ध्वनीच्या हातातील सुंदर डायमंड एंगेजमेंट रिंगनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ध्वनीने १३ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर यशसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले. तलावाच्या किनारी, डोंगररांगांच्या पार्श्वभूमीवर आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने यशने ध्वनीला प्रपोज केलं. या खास क्षणासाठी सुंदर सजावट करण्यात आली होती. फुलांची आकर्षक कमान, मेणबत्त्या आणि ‘Will You Marry Me’ असा संदेश देणारी सजावट यामुळे हा क्षण आणखी खास बनला. यशच्या या रोमँटिक प्रपोजलला ध्वनीने होकार दिला असून, दोघांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे.
या फोटोंसोबत ध्वनीने लिहिलेलं कॅप्शनही चर्चेत आहे. ‘Found me my cupcake for life. Said yessss’ असं कॅप्शन देत तिने यशसोबतच्या आयुष्यभराच्या साथीला होकार दिल्याचं जाहीर केलं. तिच्या या पोस्टनंतर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ध्वनीच्या होणाऱ्या पतीचं नाव यश भानुशाली आहे. यश उद्योजक असून गेमिंग, ई-स्पोर्ट्स आणि क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहे. तो ‘Orangutan’ या भारतीय गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स संस्थेशी जोडलेला आहे. याशिवाय त्याला फोटोग्राफीचीही आवड असल्याचं त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून दिसून येतं.
दरम्यान, ध्वनी भानुशालीने आपल्या आवाजाच्या जोरावर अल्पावधीतच संगीतविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१८ मध्ये ‘इश्तेहार’ या गाण्याद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पार्श्वगायनाला सुरुवात केली. मात्र, ‘वास्ते’ या गाण्याने तिला देशभरात मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्याला यूट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर ‘दिलबर’, ‘लेजा रे’, ‘दुनिया’, ‘सायको सैय्यां’ आणि ‘नयन’ यांसारख्या गाण्यांमधून तिने आपल्या आवाजाची जादू दाखवली. विशेष म्हणजे, ध्वनी ही प्रसिद्ध संगीत निर्माता विनोद भानुशाली यांची मुलगी आहे. गायनासोबतच तिने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. आता ध्वनीच्या साखरपुड्याच्या बातमीने तिचे चाहते आनंद व्यक्त करत असून, तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.