जळगाव,
earthquake-hits-jalgaon-district जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांना आज, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर आणि चोपडा या तालुक्यांमध्ये सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाची जाणीव होताच अनेक नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश राज्यात असल्याचे समोर आले आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.
सकाळच्या वेळी अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे संबंधित तालुक्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली. मात्र, या भूकंपामुळे जिल्ह्यात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून नाशिक आणि पालघर जिल्ह्यांत सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांनाही भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.