मुंबई
Farah Khan टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून, आतापर्यंत मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी या मंचावर हजेरी लावली आहे. आता बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नुकताच या भागाचा प्रोमो समोर आला असून, त्यात माधुरी आणि फराह यांच्यातील धमाल संवाद पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमाच्या मंचावर फराह खानचं स्वागत करताना माधुरी दीक्षितने तिच्या विविध भूमिकांचं कौतुक केलं. फराह एक उत्तम दिग्दर्शिका, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर असल्याचं माधुरी म्हणाली. मात्र, हे कौतुक सुरू असतानाच फराहने मध्येच एक मिश्किल टिप्पणी केली. ‘मी एक आईसुद्धा आहे,’ असं ती म्हणाली. त्यावर लगेचच तिने, ‘अशी आई जिने आजपर्यंत कधीच गाजराचा हलवा बनवलेला नाही,’ असंही सांगितलं. फराहचं हे उत्तर ऐकताच माधुरीला हसू आवरता आलं नाही. मंचावरही एकच हशा पिकला. तिच्या या विनोदी स्वभावामुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
माधुरी दीक्षित आणि फराह खान यांची मैत्री जुनी आहे. दोघींनीही बॉलिवूडमध्ये अनेक वर्षं काम केलं असून, मनोरंजनविश्वात आपापली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फराहने अनेक लोकप्रिय गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे, तर माधुरीच्या नृत्याची जादू आजही चाहत्यांवर कायम आहे.
काही दिवसांपूर्वी फराहने माधुरीच्या घरीही भेट दिली होती. यावेळी तिने माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत गप्पा मारल्या होत्या. आता दोघी एकाच मंचावर एकत्र आल्याने जुन्या आठवणी, बॉलिवूडमधील किस्से आणि मजेशीर संवादांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
फराह खानचा सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग १६ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. या भागात माधुरी आणि फराह यांच्यातील गप्पांसोबतच मनोरंजनविश्वातील अनेक जुन्या आठवणींनाही उजाळा मिळणार आहे. त्यामुळे हा विशेष भाग पाहण्यासाठी फराह आणि माधुरीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात यापूर्वी अशोक सराफ, रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे, सोनाली बेंद्रे आणि सोनाली कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक भागातून प्रेक्षकांना मनोरंजनाची वेगळी मेजवानी मिळत आहे.