कर्जाचा डोंगर, परिस्थितीशी संघर्ष अन् अखेर काळाचा घाला

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
farmer dies
आर्थिक विवंचना आणि कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असलेल्या आणखी एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडली आहे. चापानेर येथील गोकुळ कारभारी भाडाईत (वय ३८) यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेने संपूर्ण चापानेर गावावर शोककळा पसरली असून, भाडाईत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ भाडाईत यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना वाचवले. त्यानंतर कोणताही विलंब न करता त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गोकुळ भाडाईत यांच्यावर अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. आधीच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना कर्जाचा भार वाढत चालला होता. तीन भावांच्या वाट्याला मिळून अवघी दोन एकर शेती होती. त्यातच काही काळापूर्वी त्यांच्या एका भावाचा अपघाती मृत्यू झाला होता. या धक्क्यातून कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच गोकुळ यांच्या निधनाने त्यांच्यावर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे.

गोकुळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे. विशेषतः दोन लहान मुलींच्या भवितव्याचा आणि त्यांच्या संगोपनाचा प्रश्न आता कुटुंबासमोर उभा राहिला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, कर्जाचा वाढता भार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.