प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटवर FDAचा बडगा

अन्न व्यवसायाचे परवाने तात्काळ निलंबित

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
पुणे,
vaishali-and-rupali-restaurants पुण्यातील एफ.सी. रोडवरील प्रसिद्ध मे. हॉटेल वैशाली आणि मे. रूपाली रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान दोन्ही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाले. त्यानंतर प्रशासनाने दोन्ही रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. त्यामुळे या कारवाईने पुण्यातील खाद्यप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

fda
हॉटेल वैशालीची १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी सखोल तपासणी केली. या वेळी स्वयंपाकघरात जागेची कमतरता असल्याने कच्चा माल साठवण्यासाठी वापरण्यात येणारे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी जवळ ठेवण्यात आल्याचे आढळले. डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवण्यात आला होता. तसेच धुतलेली भांडी स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आली होती.
उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियाही उघड्या व असुरक्षित जागेत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कच्च्या चिरलेल्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या थेट वर ठेवण्यात आल्या होत्या. स्वयंपाकघराला कीटकांचा प्रवेश रोखणारे दरवाजे नव्हते. तापमानाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या, तसेच पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवालही सादर करण्यात आला नव्हता. तपासणीच्या वेळी वैध FoSTaC प्रशिक्षण घेतलेला पर्यवेक्षक उपस्थित नसल्याचेही आढळून आले.
यापूर्वी जून २०२६ मध्ये हॉटेल वैशालीला सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही तपासणीत गंभीर त्रुटी कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटची तपासणीही १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी केली. तपासणीनंतर सुनावणी घेण्यात आली आणि त्याच दिवशी परवाना निलंबित करण्याचे आदेश पारित करण्यात आले. या रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याने धूळ, घाण तसेच कीटकांचा प्रवेश होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. परिसरात पाणी साचलेले होते, साफसफाई अपुरी होती आणि कचऱ्याचे व्यवस्थापनही योग्य पद्धतीने केले जात नव्हते.
याशिवाय कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त पदार्थ आणि तयार अन्नपदार्थ झाकून न ठेवता साठवण्यात आले होते. या पदार्थांवर आवश्यक लेबलिंग नव्हते, तसेच 'Use By' तारीखही नमूद करण्यात आली नव्हती. अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील या त्रुटी अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे तपासणीत समोर आले. एफडीए प्रशासनाने दोन्ही आस्थापनांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. तपासणीत आढळलेल्या सर्व गंभीर त्रुटींचे पूर्ण निराकरण करून पुन्हा तपासणी करण्यात येईल. त्या वेळी अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आणि विभागाकडून लेखी परवानगी मिळाल्यानंतरच संबंधितांना व्यवसाय सुरू करता येईल. तोपर्यंत हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटला अन्नपदार्थांची विक्री, पार्सल सेवा किंवा होम डिलिव्हरी अशा कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.