गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर पोलिसाची कारवाई

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
वाशीम,
गोवंशाची निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या वाहतूक करणार्‍यांविरुद्ध वाशीम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत आठ गोवंश बैलांसह दोन महिंद्रा अ‍ॅपे मालवाहू वाहने असा एकूण १३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध आसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी जिल्ह्यात होणार्‍या गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना मंगरूळनाथ ते वाशीम मार्गावर दोन महिंद्रा अ‍ॅपे वाहनांतून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाशीम - मंगरुळनाथ मार्गावरील कळंबा फाटा येथे सापळा रचला. यावेळी एमएच ३७ टी १९६२ आणि एमएच ३ सी.पी. ५८८५ क्रमांकाशी संशयीत वाहने अडवून तपासणी केली असता त्यामध्ये आठ बैल अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवल्याचे आढळून आले. वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. पोलिसांनी आठ गोवंश जनावरे आणि दोन्ही वाहने असा एकूण १३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मोहम्मद फैजान मोहम्मद जावेद (वय २८, रा. दर्गा चौक, बढाईपुरा, मंगरूळनाथ) आणि जावेद अहमद अब्दुल रऊफ (वय ४५, रा. टेकळीपुरा, मंगरूळनाथ) या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये आसेगाव पोहनस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आढे, पोलिस उपनिरीक्षक शेखर मास्कर, पोलिस अंमलदार विठ्ठल महाले, तुषार ठाकरे आणि संदीप दुतोंडे यांनी केली.