वाहनचालकांनो, ३१ डिसेंबरपूर्वी सदस्यत्व नूतनीकरण करा!

अन्यथा ३०० ऐवजी थेट ८०० रुपये भरावे लागणार

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra-drivers-alert महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या मुदत संपलेल्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे नूतनीकरणाची ऑनलाइन सुविधा उपलब्ध होण्यास विलंब झाल्याने अनेक चालकांचे सदस्यत्व अद्याप नूतनीकरणाविना प्रलंबित आहे. अशा चालकांना आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत केवळ ३०० रुपये भरून सदस्यत्वाचे नूतनीकरण करता येणार आहे. मात्र, ही मुदत संपल्यानंतर म्हणजेच १ जानेवारी २०२७ पासून नूतनीकरणासाठी ८०० रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी चालकांनी मुदतीतच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

maharashtra-drivers-alert
महाराष्ट्र शासनाने प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून पात्र वाहनचालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये जीवन विमा, अपंगत्व विमा आणि आरोग्यविषयक सुविधा यांचा समावेश आहे. तसेच कर्तव्य बजावत असताना अपघात किंवा दुखापतीमुळे अडचण निर्माण झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण योजनांचाही लाभ उपलब्ध करून देण्यात येतो.
ऑनलाइन नोंदणी आणि नूतनीकरणाची सुविधा
या कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व घेण्यासाठी राज्यातील पात्र वाहनचालकांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येते. आवश्यक माहिती भरून आणि निर्धारित शुल्क ऑनलाइन जमा करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येते. सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर मंडळाच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो.
दरम्यान, ज्या चालकांच्या सदस्यत्वाची मुदत संपली आहे, त्यांनी नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या विशेष सवलतीअंतर्गत ३०० रुपये भरून ऑनलाइन पद्धतीने सदस्यत्वाचे नूतनीकरण करता येणार आहे. ही सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर लागू होणाऱ्या शुल्कात वाढ होणार असल्याने चालकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया पूर्ण करणे हिताचे ठरणार आहे.
१ जानेवारी २०२७ पासून शुल्कात वाढ
सदस्यत्व नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ३०० रुपये भरावे लागतील; मात्र १ जानेवारी २०२७ पासून हे शुल्क ८०० रुपये होणार आहे. विशेष म्हणजे, सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी ९० दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. या वाढीव कालावधीतही संबंधित चालकाने नूतनीकरण केले नाही, तर नियमानुसार त्याचे सदस्यत्व संपुष्टात येते. अशा परिस्थितीत पुन्हा नव्याने सदस्यत्व घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आणि अनावश्यक आर्थिक भार टाळण्यासाठी मुदत संपलेल्या सदस्यांनी ३१ डिसेंबरपूर्वीच ३०० रुपये भरून नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनचालकांनी या मुदतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.