दुष्काळी परिस्थितीत सिंचनासाठी पाणी : आ. कुणावार

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
हिंगणघाट,
MLA Sameer Kunawar
मतदारसंघातील कुण्याही सिंचन प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या संकटकालीन परिस्थितीतही शेतकर्यांच्या पिकांना जगविण्यासाठी सिंचनाकरिता आवश्यक पाणी सोडण्यात येत आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आ. समीर कुणावार यांनी पत्रकार परिषदेत केले.



यावेळी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, निम्न वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे, शिरूड प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता अनुप महल्ले, लाल नाला प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता राजेश पुलावार आदी उपस्थित होते.

यावेळी आ. कुणावार यांनी अधिकार्यांकडून मतदारसंघातील विविध प्रकल्पांचा आढावा घेत उपस्थित माहिती दिली. पोथरा प्रकल्पात सध्या ६७ टक्के पाणीसाठा असून कालव्याद्वारे ३४ किलोमीटरपर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे शेवटच्या ३ किलोमीटर परिसरात पाणी पोहोचू शकलेले नाही. वडगाव धरणात ४९ टक्के आणि नांद धरणात ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांतून ५६ किलोमीटरपर्यंत पाणी सोडण्यात आले असून समुद्रपूर तालुक्यातील १८ गावांमधील ५२७ हेक्टर क्षेत्राला याचा लाभ झाला आहे. शिरूड प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने येथील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. बोरधरण प्रकल्पात ५५ टक्के पाणीसाठा असून ३९ गावांमधील ५०२० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापैकी हिंगणघाट मतदारसंघातील ३२०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. लाल नाला प्रकल्पातून समुद्रपूर तालुक्यातील ३२ गावांना सिंचनासाठी एक आवर्तन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण महत्त्वाचे असल्याचे नमूद करताना पुढील वर्षी ’सुपर अल-निनो’च्या प्रभावामुळे यंदासारखीच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या असल्याचे आ. कुणावार म्हणाले. संकटसमयी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात अडचणी येत असून, या संकटाच्या काळात शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला न. प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, डॉ. उमेश तुळसकर, नगरसेवक संजय माडे, भूषण पिसे, रवी रोहणकर, दिनेश वर्मा, अंकुश ठाकूर आदी उपस्थित होते.