म्हैसूर,
modi-helps-elderly-woman कर्नाटकातील म्हैसूर येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेला अचानक चक्कर येऊन अशक्तपणा जाणवू लागला. ही बाब लक्षात येताच मोदी स्वतः त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांच्या या कृतीची भाजप कार्यकर्त्यांकडून प्रशंसा होत आहे.
शुक्रवारी म्हैसूर येथील कॉसमॉस तारांगणाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ही घटना घडली. नांजनगुड नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा आणि भाजप कार्यकर्त्या प्रेमा के. सिंबय्या यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना चक्कर येत असल्याचे पाहून पंतप्रधान मोदी यांनी तातडीने त्यांची विचारपूस केली आणि मदतीची व्यवस्था केली. त्यांना पिण्यासाठी रस देण्यात आला. तसेच पंतप्रधानांच्या ताफ्यातील डॉक्टरांकडून त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील, याचीही मोदी यांनी खात्री केली.
या घटनेचे छायाचित्र भाजप महिला मोर्चाने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहे. सुमारे ७० वर्षीय प्रेमा के. यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः पुढाकार घेत त्यांची काळजी घेतली. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत आणि इलेक्ट्रोलाइट्स उपलब्ध करून दिल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. या कृतीतून पंतप्रधानांची संवेदनशीलता दिसून येत असल्याचेही महिला मोर्चाने म्हटले आहे.
दरम्यान, म्हैसूरमध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे नागरिकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हैसूरच्या नागरिकांचे आभार मानले. कर्नाटकच्या विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याच दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी बंगळूर मेट्रोच्या 'पिंक लाईन'चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि राज्यपाल सुधा यादव उपस्थित होते. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवताना मोदी यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांचा हात धरून दोघांनी एकत्रितपणे मेट्रो सेवेला प्रारंभ केला. या कार्यक्रमातील छायाचित्रे आणि व्हिडिओही चर्चेत आले आहेत.