नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
मुंबई
MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या एकूण १३ हजार ९८० पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेला वेग देण्यासोबतच ती पारदर्शक आणि निर्धारित नियमांनुसार पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. दरम्यान, एसटीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या खासगी संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.





एसटी महामंडळाच्या भरतीच्या नावाखाली काही खासगी संस्था तरुणांना नोकरीचे आश्वासन देत त्यांच्याकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने या संस्थांवर विश्वास ठेवणाऱ्या उमेदवारांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांमुळे बेरोजगार तरुणांचे नुकसान होत असून, या गैरप्रकारांना तातडीने आळा घालणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.



या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या खासगी संस्थांची तसेच त्यामागील संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे सरनाईक यांनी सांगितले. बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



१३ हजार ९८० पदांची भरती करताना उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या पात्रता आणि निकषांनुसारच केली जावी, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.



एसटी महामंडळातील चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या या भरतीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेबाबत तरुणांमध्ये अपेक्षा वाढल्या असून, ती नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्याचे मोठे आव्हान महामंडळासमोर असेल.