मुंबई
Mumbai Bomb Threat Case मुंबईतील बँका, महापालिका मुख्यालय, विमानतळ आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या निवासस्थानांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट ई-मेल खात्यांचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले आहेत. बनावट ई-मेल खाती तयार करून ती परदेशातील व्यक्तींना पुरविणाऱ्या कथित जाळ्याचा उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एटीएसने अंकित शंखवार (२४) याला अटक केली असून, त्याने तयार केलेली ई-मेल खाती मुंबईतील धमकीसाठी वापरल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. ही खाती ‘अमीन’ नावाच्या बांगलादेशी नागरिकाला पुरविण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ५२ मिनिटांनी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबई विभागीय कार्यालयासह कुलाबा येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि झवेरी बाजार शाखेला हा संदेश पाठविण्यात आला होता. पीएनबीच्या एका शाखेत दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी स्फोट घडविण्यात येईल, असा उल्लेख त्यात होता. याशिवाय २७ नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर या तारखांचाही उल्लेख करून इतर ठिकाणी स्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती.
धमकीच्या ई-मेलमध्ये पीएनबीच्या झवेरी बाजार, मरीन लाइन्स, फोर्ट, गोरेगाव पूर्व, साकीनाका, नरिमन पॉइंट आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील शाखांना लक्ष्य करण्यात आले होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेच्या काही शाखांचाही उल्लेख होता. याशिवाय मुंबई महापालिकेचे मुख्यालय, महापौर कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी स्टेडियम आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील ‘जलसा’ हे निवासस्थानही धमकीच्या यादीत होते.
ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी तातडीने तपासणी केली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने परिसराची पाहणी केली; मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असताना उत्तर प्रदेश एटीएसने २८ ऑक्टोबर रोजी अटक केलेल्या अंकित शंखवारचे नाव समोर आले. बनावट ई-मेल खाती तयार करून ती परदेशातील व्यक्तींना पुरविणाऱ्या कथित नेटवर्कमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
एटीएसच्या दाव्यानुसार, शंखवारने तयार केलेली ई-मेल खाती बांगलादेशी नागरिक ‘अमीन’ याला विकली होती. या खात्यांच्या पुरवठ्याच्या मोबदल्यात त्याला तुर्की आणि इजिप्तमधील स्रोतांकडून ५० हजार अमेरिकी डॉलर, म्हणजेच सुमारे ४७ लाख रुपये मिळाल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. मुंबई महापौर कार्यालयाला २३ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलसाठी वापरलेले आणखी एक खातेही शंखवारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मिळाल्याचा दावा एटीएसने केला आहे.
तपासात शंखवार २०२१ पासून बनावट ई-मेल खाती तयार करीत असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येते. ही खाती तयार करण्यासाठी तो वाय-फाय कनेक्शन, प्रॉक्सी नेटवर्क आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करीत असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. या पद्धतीमुळे ई-मेल खात्यांचा प्रत्यक्ष वापरकर्ता कोण आहे, याचा माग काढणे कठीण होत असल्याचे सांगितले जाते.
मात्र, मुंबईतील विविध ठिकाणांना धमकी देणारे ई-मेल नेमके कोणी पाठवले, शंखवारने पुरविलेल्या खात्यांचा वापर कोणत्या व्यक्तींनी केला आणि या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधार कोण आहेत, याचा शोध अद्याप सुरू आहे. त्यामुळे या तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.