प्रेमविवाहानंतर पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-lakadganj-death-caseचार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मोठ्या धाडसाने प्रेम विवाह केला. सुखी संसार सुरु असताना एक बाळ झाले. मात्र, दरम्यान पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यामुळे पत्नी बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने पत्नीच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज लकडगंजमध्ये उघडकीस आली. मयूर गिरडकर (२६) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना त्याने लिहिलेली चिठ्ठीही आढळली असून, त्यातील मजकुरातून आत्महत्येमागील कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

suicide 
मयूर हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तो पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. अलीकडेच त्यांच्या संसारात चिमुकल्या बाळाचे आगमन झाले होते. मात्र, काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाले. या वादानंतर पत्नी बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. पत्नी आणि बाळापासून दूर राहावे लागत असल्याने मयूर तणावात होता, अशी माहिती आहे. तो नियमितपणे जेवणासाठी वडिलांच्या घरी जात असे. मात्र, घटनेच्या दिवशी तो जेवणासाठी घरी पोहोचलाच नाही.
भाऊ दिसला गळफास घेतलेल्या अवस्थेत
मयूर घरी जेवणासाठी न आल्याने चिंतित झालेल्या भावाने त्याला फोन केला. वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने भाऊ त्याच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच मयूर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार पाहून भावाला मोठा धक्का बसला. त्याने तातडीने कुटुंबीयांसह पोलिसांच्या ११२ क्रमांकावर माहिती दिली. माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. घटनास्थळावरून मयूरने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीतील मजकूर आणि अन्य परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले असून, प्रेमविवाहानंतर सुरू झालेल्या संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.