शेजारी राहणाऱ्या वृद्धाकडून मुलीचा विनयभंग

शाळकरी मुलीने कुटुंबीयांना सांगितला प्रकार

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-pocso-caseघराशेजारी राहणाऱ्या एका ५८ वर्षीय व्यक्तीने एका शाळकरी मुलीशी लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 

asult 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह आरोपीच्या घराशेजारी राहते. आरोपीचे कुटुंबाशी जवळचे संबंध होते. २३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. एका प्रसंगी मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी घरात शिरला. त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करत तिच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाली होती. मात्र, अखेर तिने धाडस करून कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मुलीने दिलेली माहिती समजल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने भांडेवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ७५(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ८ आणि १० अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
विश्वासाच्या नात्यालाच तडा
अल्पवयीन मुलीसाठी सुरक्षित वाटणाऱ्या कौटुंबिक नात्यांमधूनच असा कथित प्रकार समोर येणे चिंताजनक आहे. भीतीपोटी गप्प राहण्याऐवजी मुलीने कुटुंबीयांना माहिती दिल्यामुळे प्रकरण उघडकीस आले. अशा घटना सध्या वाढत असल्यामुळे मुलींना घरात एकटे सोडताना पालकांच्या मनात नेहमी भीती असते.