अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-woman-stalking-caseमोबाईल क्रमांक ब्लॉक करून बोलणे बंद केल्याच्या रागातून शेजारी राहणाऱ्या तरुणाने २६ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला भररस्त्यात शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना डिगडोह परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी प्रदीप यादव (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी डिगडोह येथे राहते. तिची आणि शेजारी राहणाऱ्या प्रदीपची पूर्वी मैत्री होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे तरुणीने त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. तरुणीने संपर्क तोडल्यामुळे आरोपी नाराज होता. तिने पुन्हा आपल्याशी बोलावे, यासाठी तो तिच्यावर वारंवार दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता तरुणी डिगडोह देवनगर नगर परिषद कार्यालयातील कॅश काउंटरजवळून जात होती. त्यावेळी आरोपीने तिला अडवून वाद घातला.
माझ्याशी का बोलत नाहीस आणि मोबाईल क्रमांक का ब्लॉक केला, अशी विचारणा करत त्याने तातडीने क्रमांक अनब्लॉक करण्याची मागणी केली. तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिचा पाठलाग केला, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .