नांदेड
pakistani beauty creams नांदेडमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा आणि आर्सेनिकसारखी घातक रसायने आढळल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आलेल्या या उत्पादनांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यामध्ये विषारी रसायनांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे समोर आले. सुमारे चार महिन्यांपूर्वी एका दुकानावर छापा टाकून हा माल जप्त करण्यात आला होता. आता प्रयोगशाळेच्या अहवालातून या उत्पादनांच्या वापरामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.

९ जुलै २०२६ रोजी नांदेडमधील मक्का गल्ली परिसरातील ‘अफराह कलेक्शन’ या दुकानावर पोलिस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान सुमारे ३९ लाख ६९ हजार रुपये किमतीची पाकिस्तानी बनावटीची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातून या सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाऱ्याचे प्रमाण अत्यंत धोकादायक असल्याचे उघड झाले.
जप्त केलेल्या ‘PARLEY 24K Gold Gleam Beauty Cream’ या क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण तब्बल ४८ हजार ४५३.४४ पार्ट्स पर मिलियन (पीपीएम) इतके आढळले. सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाऱ्याची मर्यादा एक पीपीएम असताना या क्रीममधील प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा प्रचंड अधिक असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे ‘GOREE Beauty Cream with Lycopene’ या दुसऱ्या क्रीममध्येही ६ हजार ९२४.९४ पीपीएम पारा आढळला. दुकानाचे मालक मोहम्मद जियाउद्दीन आणि मोहम्मद वाजिद यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या या उत्पादनांवर उर्दू आणि इंग्रजी भाषेत लेबल लावण्यात आले होते.
‘मेड इन पाकिस्तान’ अशी नोंद असलेल्या या सौंदर्यप्रसाधनांमध्ये घातक रसायने आढळल्याने तपास यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा उत्पादनांचा वापर केल्यास त्वचेशी संबंधित गंभीर विकार उद्भवू शकतात. तसेच किडनीचे नुकसान होण्याबरोबरच मज्जासंस्थेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा आणि परकीय व्यापार कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपास पथकातील अधिकाऱ्याने दिली. ही उत्पादने भारतात नेमकी कोणत्या मार्गाने आणण्यात आली, याचा शोध आता घेतला जात आहे.
दरम्यान, त्वचा गोरी करण्यासाठी, डाग-धब्बे कमी करण्यासाठी तसेच मुरुमांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक सौंदर्यप्रसाधने बाजारात विकली जातात. मात्र, काही उत्पादनांमध्ये पाऱ्यासारख्या रसायनांचा वापर केला जातो. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पारा असलेली उत्पादने त्वचेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे त्वचा पातळ होणे, संवेदनशीलता वाढणे, चट्टे पडणे आणि त्वचेच्या रंगात असामान्य बदल होणे अशा समस्या उद्भवू शकतात. गंभीर परिस्थितीत त्वचेमार्फत शरीरात शोषला गेलेला पारा किडनी, यकृत आणि फुफ्फुसांसारख्या अवयवांवर परिणाम करू शकतो. त्याचबरोबर मज्जासंस्थेलाही हानी पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे आकर्षक दावे करणारी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, घटक आणि अधिकृत मान्यता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.