रायगड
pen bribery case शासकीय काम करून देण्यासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे निवासी करारनामा करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. प्रशांत आबाजी जगदाळे असे या कारवाईत पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पेण येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक श्रेणी-१ आणि मुद्रांक निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका इमारतीतील सदनिकाधारकाला आपल्या सदनिकेचा निवासी करारनामा करून घ्यायचा होता. या कामासाठी प्रशांत जगदाळे यांनी संबंधित व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. शासकीय काम पूर्ण करण्यासाठी एवढी मोठी रक्कम लाच म्हणून मागितली जात असल्याने संबंधित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटकडे तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रकरणाची पडताळणी केली. त्यामध्ये लाचेच्या मागणीसंदर्भात खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे प्रशांत जगदाळे हे लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर पेणमधील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी प्रशांत आबाजी जगदाळे यांच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांना विविध कामांसाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारींची पडताळणी करून सापळा कारवाया केल्या जातात. पेणमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी कार्यालयांमधील कथित लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे.