बनावट सह्या अन् खोटी ओळखपत्रे वापरून शेती हडपली!

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
पुणे,
pune-bhor-land-fraud-caseभोर तालुक्यातील सांगवी (वेळवंड खोरे) आणि साळुंगण येथील वडिलोपार्जित जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे आणि बोगस व्यक्तींचा वापर करून जमीन हडपल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाईक एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट लिमिटेडचे चेअरमन कमांडर दीपक दिगंबर नाईक यांच्यासह ८ जणांविरोधात भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, जातिवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
 

land scam 
याप्रकरणी संदीप तुकाराम जगताप (वय ५० वर्षे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार, सांगवी आणि साळुंगण परिसरातील अनेक गट क्रमांकांमधील जमीन ही त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या जमिनीवर त्यांच्या कुटुंबासह भावकीतील इतर सदस्यांचाही सामाईक हक्क आहे. मात्र, कुटुंबातील काही सदस्यांनी जमीन विक्रीला संमती दिलेली नसताना आणि कोणताही मोबदला मिळालेला नसताना जमिनीचे खरेदीखत तयार करून सातबारा उताऱ्यावर परस्पर इतरांची नावे लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
२०१३-१४ च्या सुमारास त्यांच्या जमिनीवर काही व्यक्ती तार कंपाउंड करण्यासाठी आले होते. याबाबत विचारणा केली असता ही जमीन दीपक दिगंबर नाईक यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित जमीन व्यवहाराची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी भावकीतील काही शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, शशिकांत रामभाऊ कंक आणि बाजीराव शिळीमकर यांनी तुमच्या नावावर जास्त जमीन असल्यास वनविभागाचा शिक्का पडू शकतो, अशी भीती दाखवली होती. त्यानंतर खातेफोड करून देण्याच्या बहाण्याने त्यांना भोर तहसील कार्यालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्या सह्या आणि अंगठे घेण्यात आले. मात्र, आम्ही जमीन विकलेली नाही आणि आम्हाला कोणताही मोबदला मिळालेला नाही, असे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.