पुणे,
pune-courier-employee-theftपुण्यात कुरिअर कंपनीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत २० वर्षीय कर्मचाऱ्याने तब्बल २८ लाख रुपये रोख आणि सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पलायन केल्याची घटना समोर आली होती. मुंबईतील कार्यालयात पोहोचवण्यासाठी दिलेला ऐवज घेऊन कर्मचारी पसार झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तब्बल २५ दिवस मोहीम राबवली. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सुमारे १० हजार किलोमीटरचा प्रवास केला. अखेर तपासाअंती चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. कुरिअर कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याकडे २८ लाख रुपये रोख आणि सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग मुंबईला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, त्याने नियोजित ठिकाणी बॅग पोहोचवण्याऐवजी ऐवजासह पलायन केले होते.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून १६ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे, सात लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि चांदीची साखळी असा एकूण २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तब्बल १० हजार किलोमीटरचा माग काढत पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईची चर्चा होत आहे.