सँडपेपरगेटचा वाद पुन्हा पेटला; वॉर्नरचा आरोप!

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
ऑस्ट्रेलिया,
sandpapergate-controversy-reignites ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील बहुचर्चित सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याने आपल्या आत्मचरित्रातून केलेल्या नव्या खुलाशानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यातच माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याने वाद अधिकच वाढला आहे.
 
sandpapergate-controversy-reignites
 
उस्मान ख्वाजा याने 'सबर' या आत्मचरित्रात २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर घडलेल्या चेंडूशी छेडछाड प्रकरणाबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती. मात्र, कसोटी संघाचा सध्याचा कर्णधार पॅट कमिन्स याने ख्वाजाचे आरोप फेटाळून लावत त्यांना पूर्णपणे निरर्थक ठरवले आहे.
 
या वादात डेव्हिड वॉर्नर याने १४ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे नव्या प्रश्नांना तोंड फुटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये केलेल्या चौकशीदरम्यान वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांची चौकशीच केली नसल्याचा दावा वॉर्नरने केला आहे. ही बाब खरी असेल, तर गोलंदाजांना चेंडूशी छेडछाड प्रकरणाची माहिती नव्हती, असा निष्कर्ष क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसा काढला, असा सवाल त्याने उपस्थित केला.
 
या प्रकरणात सुरुवातीपासूनच काही खेळाडूंना जबाबदार धरण्याचे ठरवण्यात आले होते, असा आरोपही वॉर्नरने केला. चौकशी केवळ नावापुरती करण्यात आली असून, संपूर्ण सत्य समोर आणण्याऐवजी गोलंदाजांना या प्रकरणाची माहिती नव्हती, हीच भूमिका पुढे रेटली जात असल्याचे त्याने म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही त्याने व्यक्त केला.
 
दरम्यान, वॉर्नरच्या आरोपांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान सर्व खेळाडूंना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती, असे संस्थेने स्पष्ट केले. तसेच त्यानंतरच्या आठ वर्षांतही संबंधितांना नव्याने पुरावे सादर करण्याची संधी उपलब्ध होती, असे सांगण्यात आले. प्रत्येक खेळाडू आणि माजी खेळाडूला या घटनेबाबत आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचा पुनरुच्चारही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला.
 
मात्र, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांची प्रत्यक्षात चौकशी करण्यात आली होती की नाही, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात स्पष्ट उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सँडपेपरगेट प्रकरणातील तपासाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.