सोलापूर,
solapur-dudhani-murder-caseसोलापूर जिल्ह्यातील दुधनी शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका मोबाईल शॉपीमध्ये घुसून 30 वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवण्यात आलं. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघा जणांच्या टोळक्याने दुकानात घुसून हा जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महेश गुड्डोडगी (वय 30) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे दुधनी परिसरासह संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दुधनी येथील एका मोबाईल दुकानात घडली. जुन्या वादातून मुख्य आरोपी सचिन कौलगी आणि त्याचे इतर तीन साथीदार दुकानात घुसले. त्यांनी सुरुवातीला महेश गुड्डोडगी याला लाथाबुक्क्यांनी आणि चप्पलने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण सुरू असतानाच आरोपींनी लोखंडी पाईपने महेशच्या डोक्यात आणि शरीरावर प्राणघातक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की महेश गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेनंतर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर मुख्य आरोपी सचिन कौलगी आणि त्याचे तीन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
दुधनी शहर कर्नाटक सीमेला लागून असल्याने आरोपी कर्नाटकच्या दिशेने पळून गेल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सोलापूर पोलिसांची विशेष पथके रवाना झाली असून, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत जोरदार शोधमोहीम राबवली जात आहे.