काळीज पिळवलं, पण सारेच हतबल!

त्या घरात केवळ आक्रोश, आठवणी आणि हुंदके

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
भंडारा (तिर्री ),
the-leopard-pounced-on-the-baby संध्याकाळच्या स्वयंपाकाची घरात लगबग सुरू होती. सहा महिन्याचे चिमुकले बाळ घरातच खाली खेळण्यात रमले होते. त्याच्या दोन मोठ्या बहिणीही जवळच होत्या. रोजच्याप्रमाणे घरातील वातावरण आनंदी होते. आजोबांना आपल्या नातवाचे लाड पुरवावे म्हणून त्याला घेण्यासाठी स्वयंपाक घरात पाऊल ठेवणार तेवढ्यात काळ बनून आलेल्या बिबट्याने बाळावर झडप घातली. क्षणात होत्याचे नव्हते झाले अन चिमुरडा कायमचा सगळ्यांना सोडून गेला... आज स्वयंपाक घरात स्वयंपाकाच्या तयारीचा पसारा तसाच पडला होता, चिमुकलाही घरातच होता मात्र तो काचेच्या पेटीत कायम स्वरूपी निजलेला! त्या निरागस चेहऱ्याला काचेतून कुरवाळत आसवे गळणाऱ्या कुटुंबीयांची हतबलता भयाण वास्तवाची जाणीव करून देणारी होती.
 
 
the-leopard-pounced-on-the-baby
 
पवनी तालुक्यातील तिर्री गाव हे अड्याळ वनपरीक्षेत्र अंतर्गत येते. याच गावातील गुरे चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या अभिमान बोन्द्रे यांच्या कुटुंबावर 13 नोव्हेंबरच्या रात्री मोठा आघात झाला. डोळ्यादेखत सहा महिन्याच्या बाळाला गमावलेल्या या कुटूंबाची व्यथा कल्पनेच्या पलीकडे आहे. आज प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर असे दुःख कुणाच्याही वाट्याला ना यावे, हेच शब्द बाहेर पडावे असे वास्तव पुढे आले. अद्वित या 6 महिन्याच्या लेकराला गमावलेल्या आईचा आजही अविरत सुरु असलेला आक्रोश, नातवाचे गोड कौतुक करण्यासाठी धडपडणाऱ्या आजी आजोबांची झालेली केविलवानी परिस्थिती, मनात दुःख आणि आठवणींचे काहूर माजले असतानाही धीर देण्यासाठी डोळ्यातच आपली आसवे जिरविणारा तो बाप...दगडालाही पाझर फुटावे असेच होते. एकीकडे काळजाचा तुकडा गेल्याची तळमळ होती, तर दुसरीकडे त्याच घरात काचेच्या पेटीत निरागस चीर निद्रेत विसावलेला अद्वित होता.
 
 
या घटनेत केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण गावाचे काळीज पिळवटून निघाले आहे. दोन मोठ्या बहिणींच्या डोळ्यांसमोरून लहान भावाचा चेहरा कसा जाणार? ज्या घरात बाळाच्या बोबड्या बोलांनी आणि खेळण्याच्या आवाजाने आनंद नांदत होता, त्या घरात आता भयाण शांतता पसरली आहे. आई-वडिलांचे स्वप्न, आजोबांचे लाड आणि बहिणींचे बालपण एका क्षणात उद्ध्वस्त झाले. मदत मिळेल, सांत्वनही होई मिळणार नाही. आभाळा पेक्षाही मोठे दुःख बोन्द्रे कुटुंबीयांच्या वाट्याला आले. ते तर जंगलात गेले नव्हते, मग घरात डोळ्यादेखत लेकरांचा जीव जात असेल तर मात्र याची मिमांसा व्हायलाच हवी! जंगलव्याप्त गाव असल्याने घरा मागे जाळ्या लावून वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्या इतपत प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांना वनविभागाने मदतीचा हात द्यायला नको का... नाहीतर आज अद्वित गेला, उद्या आणि कुणाच्या घरात जाऊन मदतीचा धनादेश देण्याची वेळ येणार नाही, हे कुणी सांगावे.