अमेरिका,
US Flight Chaosअमेरिकेतील हवाई वाहतूक व्यवस्थेला शुक्रवारी (दि. १३) रोजी मोठा तांत्रिक फटका बसला. देशभरातील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमधील दळणवळण यंत्रणेत बिघाड झाल्याने फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) सुरक्षेच्या कारणास्तव नवीन विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली. या निर्णयामुळे अमेरिकेतील विमानसेवा चार तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली. सुमारे १५ लाख प्रवाशांना या गोंधळाचा फटका बसला असून १० हजारांहून अधिक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली. अखेर रात्री उशिरा उड्डाणबंदी उठवण्यात आली. मात्र, जुन्या तांत्रिक यंत्रणांमधील बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले असून विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार, १३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील वेळेनुसार दुपारी सुमारे ३.३६ वाजता देशातील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमधील दळणवळण यंत्रणेत तांत्रिक समस्या निर्माण झाली. या बिघाडाचा परिणाम अनेक एअर रूट ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्सवर झाला. त्यामुळे विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि वैमानिकांशी संपर्क साधणे यामध्ये अडचणी निर्माण झाल्या.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत FAA ने देशभरातील नवीन विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली. त्यावेळी अमेरिकेच्या हवाई हद्दीत ३,५०० हून अधिक विमाने उड्डाण करत होती. मात्र, आधीच हवेत असलेल्या विमानांना नियोजित ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे ही बंदी मुख्यतः नव्याने होणाऱ्या उड्डाणांवर लागू होती.
अमेरिकेचे वाहतूकमंत्री शॉन डफी यांच्या माहितीनुसार, रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेच्या हवाई हद्देतील विमानांची संख्या ४०० पेक्षा कमी झाली होती. त्यानंतर रात्री ८.१५ वाजता उड्डाणांवरील निर्बंध उठवण्यात आले. मात्र, उड्डाणांना परवानगी मिळाली तरी विमानसेवा लगेच सुरळीत झाली नाही.