वयाच्या १५ व्या वर्षी वैभवचा विश्वविक्रम

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
पाटणा,
vaibhavs-world-record भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत बिहार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
 
vaibhavs-world-record
 
१४ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात झाली. सौराष्ट्रविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बिहार संघाचे कर्णधार म्हणून मैदानात उतरताच वैभवच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. त्याने १५ वर्षे आणि २३२ दिवसांच्या वयात कर्णधारपद स्वीकारले. यापूर्वी हा विक्रम क्रोएशियाच्या जेक वुकुसिक याच्या नावावर होता. त्याने वयाच्या १७ वर्षे आणि ३११ दिवसांनी सायप्रसविरुद्ध टी-२० संघाचे नेतृत्व केले होते.
 
भारतीय देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्येही वैभवने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी सर्वात कमी वयात कर्णधार होण्याचा विक्रम महिपाल लोमरोर याच्या नावावर होता. त्याने २०१८ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राजस्थान संघाचे नेतृत्व करताना वयाची १८ वर्षे आणि ६७ दिवस पूर्ण केली होती. आता वैभवने हा विक्रमही मागे टाकला आहे.
 
दरम्यान, कर्णधार म्हणून वैभवला पहिल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्याने १२ चेंडूंचा सामना करत १८ धावा केल्या. बिहार क्रिकेट असोसिएशनचे मुख्य निवडकर्ता हरविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवला केवळ पहिल्या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
 
पहिल्या सामन्यानंतर वैभव भारत 'अ' संघासोबत इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कतारला रवाना होणार आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत बिहार संघाचे नेतृत्व उपकर्णधार सूरज कश्यप याच्याकडे सोपवण्यात येणार आहे. अशा प्रकारे अल्पवयातच वैभवने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची ऐतिहासिक नोंद केली आहे.