वर्धा,
Dr Abhay Bang सत्याला जेव्हा शब्दांची जोड मिळते, तेव्हा साहित्य निर्माण होते. विनोबा भावे यांच्या लेखनात सत्य, विचारांची प्रगल्भता आणि जीवनानुभव यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यामुळे विनोबा हे केवळ साहित्यिक नव्हते तर साहित्यिकांचे महासाहित्यिक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.

ते साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग तसेच अन्य सहसंयोजक संस्थांच्या संयुक्त वतीने आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्यावर आधारित ’शंभराव्या नांदी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार होते तर विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रदीप दाते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. नितीन संगमनेरकर, संमेलन कार्याध्यक्ष तसेच वि. सा. संघाच्या वर्धा शाखाध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. बंग पुढे म्हणाले की, विनोबांचे साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसून ते जीवनमूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.याच सत्रात ’भूदान चळवळ आणि महाराष्ट्र’ या विषयावर ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी भूदान चळवळीचा सामाजिक, ऐतिहासिक आणि वैचारिक प्रवास उलगडून दाखविला.
दुपारच्या सत्रात अकोला येथील हृदया इंदाने यांनी ’मी सावित्री बोलतेय!’ या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा प्रभावी आविष्कार सादर केला. त्यानंतर झालेल्या कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथाकार डॉ. सतीश तराळ होते. यामध्ये अ. भा. ठाकूर (आर्णी, जि. यवतमाळ) आणि प्रा. मीनल रोहनकर (वर्धा) यांनी आपल्या कथा सादर केल्या.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गजानन कोटेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नितीन संगमनेरकर, डॉ. विलास देशमुख उपस्थित होते. स्वागताध्यक्ष प्रदीप दाते व वर्धा शाखा अध्यक्ष प्रा. डॉ राजेंद्र मुंडे यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत अशा साहित्यिक उपक्रमांमधून समाजात वैचारिक जाणीव आणि वाचनसंस्कृती अधिक समृद्ध होण्याची गरज व्यक्त केली.