मुंबई
Vishal Mishra छटपूजा हा लाखो भाविकांसाठी श्रद्धा आणि कुटुंबाच्या एकत्र येण्याचा महत्त्वाचा सण आहे. मात्र, या काळात आपल्या गावी परतण्यासाठी अनेकांना प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन प्रसिद्ध गायक विशाल मिश्रा याने एक महत्त्वाचा संकल्प केला आहे. पुढील वर्षापासून छटपूजेच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आपण आणि आपले सहकारी शक्य तेवढी मदत करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही भावना व्यक्त केली असून, त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

विशाल मिश्राने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये छटपूजेच्या काळात घरी परतणाऱ्या भाविकांच्या अडचणींकडे लक्ष वेधले. दरवर्षी छट महापर्वाच्या निमित्ताने लाखो भाविकांना आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी गावी जायचे असते. मात्र, प्रवासादरम्यान अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांना वेळेत घरी पोहोचणे कठीण होते, असे त्याने नमूद केले. याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षापासून आपण आणि आपले सर्व सहकारी मिळून शक्य तितक्या भाविकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विशालने सांगितले. छट महापर्वाच्या दिवशी कोणालाही आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागू नये, हाच या प्रयत्नामागील उद्देश असल्याचेही त्याने स्पष्ट केले. पोस्टच्या शेवटी त्याने ‘जय छठी मैया!’ असा जयघोष केला.
विशाल मिश्राने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये त्याने नेपाळ आणि आसाम येथे संगीत कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली होती. या दोन्ही कार्यक्रमांतून मिळणारे उत्पन्न पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी दान करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्यामुळे छटपूजेच्या भाविकांसाठी केलेल्या नव्या संकल्पामुळे त्याच्या सामाजिक कार्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
विशाल मिश्राच्या संगीत कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने सुरुवातीला डीडी नॅशनलवरील एका रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांसमोर हजेरी लावली होती. त्याने ‘इंडियन आयडॉल’साठी ऑडिशनही दिले होते; मात्र त्याची निवड झाली नव्हती. २०१६ मध्ये तमिळ चित्रपट ‘देवी’मधून त्याने संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटासाठी त्याने ‘जाने दे’ हे गाणे संगीतबद्ध केले. हे गाणे आतिफ असलमने गायले होते. ‘मुन्ना माइकल’ आणि मराठी चित्रपट ‘एफयू : फ्रेंडशिप अनलिमिटेड’साठीही त्याने संगीत दिले आहे.
विशालने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्येही काम केले आहे. ‘यमला पगला दीवाना फिर से’ या चित्रपटासाठी त्याने ‘रफ्ता रफ्ता’ ही धून तयार केली होती. या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये सलमान खान विशेष भूमिकेत दिसला होता. ‘रेस ३’ या चित्रपटासाठी त्याने ‘सेल्फिश’ हे रोमँटिक गाणे संगीतबद्ध केले होते. या गाण्याचे बोल सलमान खानने लिहिले होते आणि तो त्यात दिसलाही होता. याशिवाय ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शीर्षकगीतही विशालने तयार केले होते. या चित्रपटात करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या.संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा विशाल आता सामाजिक उपक्रमांमधूनही योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. छटपूजेच्या निमित्ताने भाविकांना कुटुंबीयांसोबत सण साजरा करता यावा, यासाठी त्याने घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय ठरत आहे.