वाशीम,
washim-microfinance-loan-recovery-guidelinesदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांकडून कर्जवसुली करताना मायक्रोफायनान्स कंपन्यांनी संवेदनशीलता व सहानुभूतीची भूमिका घ्यावी. कर्जदारांवर कर्जफेडीसाठी कोणताही अनावश्यक दबाव आणू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा दालनात जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. मायक्रोफायनान्स इंडस्ट्री नेटवर्कचे उपाध्यक्ष (राज्यस्तरीय उपक्रम) देवेंद्र शहापूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा उपनिबंधक माणिक लटपटे आणि जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहुलकुमार गजभिये व भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या स्व-नियामक संस्था असलेल्या या नेटवर्कशी संलग्न सुमारे २५ मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीची माहिती देताना देवेंद्र शहापूरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना आर्थिक गरजेनुसार विनातारण छोटी कर्जे उपलब्ध करून दिली जातात.
वाशीम जिल्ह्यात सध्या सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, त्यापैकी जवळपास ९९ टक्के कर्जे महिला व महिला बचत गटांना देण्यात आली आहेत. कर्जवसुली करताना परिस्थितीचे भान ठेवून कर्जदारांशी सहानुभूतीपूर्ण व्यवहार करणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी व ग्रामीण कुटुंबांवर कर्जफेडीसाठी दबाव आणू नये, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले. यावेळी मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कर्जवसुलीबाबत सहकार्याची भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. ज्या कर्जदारांना हप्ते भरणे शय आहे, त्यांच्याकडून नियमित हप्ते स्वीकारण्यात येतील, तर आर्थिक अडचणींमुळे परतफेड करणे शय नसलेल्या कर्जदारांना नियमानुसार योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या नियमांनुसार चालणार्या कर्जवसुली प्रक्रियेत नियमबाह्य अडथळे निर्माण होऊ नयेत. मात्र, खासगी वित्तीय कंपन्या, काही पतसंस्था तसेच अवैध सावकारांकडून धमकी देऊन किंवा मानसिक दबाव आणून नियमबाह्य पद्धतीने कर्जवसुली केल्यास ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारे शेतकरी व कर्जदारांना त्रास देणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकार्यांनी दिला. कर्जवसुलीच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला धमकावले जात असेल किंवा नियमबाह्य पद्धतीने त्रास दिला जात असेल, तर नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक अथवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
अशा प्रकरणामध्ये पोलिस प्रशासनाला आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.