मुंबई
26/11 मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात काम पाहिलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. मुंबईत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कराचीतील नियंत्रण कक्षातून दूरध्वनीद्वारे सूचना देणाऱ्या पाच हँडलर्सपैकी एकजण भारतीय होता आणि तो महाराष्ट्रातील असल्याचे निकम यांनी म्हटले आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांसह मुंबई पोलिसांचे अधिकारी विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे तसेच मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक जवान शहीद झाले. अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले, तर उर्वरित नऊ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हल्ल्यादरम्यान पाकिस्तानातील कराची येथून हँडलर्स दहशतवाद्यांना सातत्याने सूचना देत होते.
कसाबला फाशी देण्यात आल्याबाबत बोलताना निकम यांनी सांगितले की, त्याला शिक्षा होणार याची आपल्याला खात्री होती. कारण एका लहान मुलीसह अनेक प्रत्यक्षदर्शींनी कसाबला ओळखले होते आणि न्यायालयात त्याच्या विरोधात साक्षही दिली होती. त्यामुळे त्याला फाशी होणे ही आपल्यासाठी अनपेक्षित किंवा मोठी बाब नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
हल्ल्याच्या तपासादरम्यान कराचीतील हँडलर्स आणि मुंबईत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमधील दूरध्वनी संभाषणांचे महत्त्वाचे पुरावे समोर आले होते. या संभाषणांची पडताळणी करण्यासाठी आपण अमेरिकेच्या एफबीआयमधील तज्ज्ञांना न्यायालयात बोलावले होते, असे निकम यांनी सांगितले. कराचीतील नियंत्रण कक्षातून चार ते पाच जण दहशतवाद्यांना फोनवरून सूचना देत होते. हल्लेखोर माध्यमांच्या प्रतिनिधींशीही संपर्क साधत होते. पत्रकार अंजना ओम कश्यप यांनाही एका दहशतवाद्याने फोन केला होता, अशी माहिती त्यांनी दिली.
निकम यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईवर हल्ला करणारे दहा दहशतवादी पंजाबी मुस्लिम होते. त्यांना हिंदी भाषा व्यवस्थित अवगत नव्हती. त्यामुळे कराचीतील हँडलर्स त्यांना हिंदीत कसे बोलायचे, कोणते शब्द वापरायचे, याबाबत सूचना देत होते. या संभाषणांमध्ये कराचीतील नियंत्रण कक्षातून बोलणाऱ्या चार व्यक्तींच्या भाषेत पंजाबी मिश्रित हिंदीचा प्रभाव जाणवत होता; मात्र एक व्यक्ती स्पष्ट आणि अस्खलित हिंदी बोलत होती. त्या व्यक्तीचा आवाज आणि बोलण्याची पद्धत लक्षात घेता, हा हँडलर भारतीय असून महाराष्ट्रातील असल्याचा दावा निकम यांनी केला.
या व्यक्तीची ओळख उघड करण्याबाबत विचारले असता, ‘मला यापुढे काहीही विचारू नका. वेळ आल्यावर मी उत्तर देईन,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे २६/११ च्या हल्ल्याच्या तपासातील कराचीतील हँडलर्सपैकी महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या कथित व्यक्तीची ओळख नेमकी कोणती, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. निकम यांच्या या दाव्याला अधिकृत तपासातील पुराव्यांची पुष्टी मिळते का, याकडेही लक्ष लागले आहे.