६५ लाख वर्षांपूर्वीचा महाकाय हत्ती नर्मदेच्या खोऱ्यात?

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
नर्मदा खोरे
elephant fossil discovered मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात प्रागैतिहासिक काळातील एका महाकाय प्राण्याचा जीवाश्म आढळल्याने पुराजीवशास्त्राच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायसेन जिल्ह्यातील देवरी परिसरात नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीचा काही भाग खचला आणि त्यातून हा अवशेष उघडकीस आला. दातांच्या विशिष्ट रचनेवरून हा प्राचीन हत्तीचा जबडा असावा, असा अंदाज जीवाश्मतज्ज्ञ व्ही. के. खन्ना यांनी व्यक्त केला आहे. तर डॉ. प्रियांका घोष यांनी हा अवशेष ‘स्टेगोडॉन नामॅडिकस’ (Stegodon namadicus) या नामशेष झालेल्या प्राचीन हत्तीच्या प्रजातीचा असण्याची शक्यता वर्तवली आहे. या जीवाश्माचे वय सुमारे ६५ लाख वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्याची नेमकी ओळख आणि वय निश्चित करण्यासाठी शास्त्रीय तपासणी आवश्यक आहे.



या शोधामुळे नर्मदा खोऱ्यातील प्राचीन जीवसृष्टी, पर्यावरणातील बदल आणि हत्तींच्या उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्याची संधी निर्माण झाली आहे. जीवाश्म म्हणजे लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांचे जतन झालेले अवशेष अथवा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा. हाडे, दात, कवटी, शिंगे, पानांचे ठसे, लाकडाचे अवशेष, परागकण आणि बीजाणू अशा विविध स्वरूपांत ते आढळतात. या जीवाश्मांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या शाखेला पुराजीवशास्त्र (Palaeontology) असे म्हणतात. अशा अवशेषांच्या अभ्यासातून प्राचीन प्राण्यांची शरीररचना, आकारमान, आहार, अधिवास आणि त्या काळातील पर्यावरणाची स्थिती समजण्यास मदत होते.



विशेषतः हत्तीच्या दातांची रचना त्याच्या आहाराविषयी महत्त्वाची माहिती देऊ शकते. दातांवरील कंगोरे, त्यांची उंची आणि रचना यांवरून संबंधित प्राणी गवत खात होता की झाडांची पाने व फांद्या यांवर अवलंबून होता, याचा अंदाज घेता येतो. त्याचबरोबर दातांमधील कार्बन आणि ऑक्सिजन समस्थानिकांचे (Isotopes) विश्लेषण केल्यास प्राण्याच्या आहारासह त्या काळातील पर्यावरणाची माहिती मिळू शकते. जीवाश्मांच्या परिसरात सापडणारे परागकण, बीजाणू आणि वनस्पतींचे अवशेष यांचाही अभ्यास केला जातो. त्यातून तत्कालीन हवामान, जंगलांचे स्वरूप आणि गवताळ प्रदेशांचा विस्तार याविषयी निष्कर्ष काढता येतात.



भारतातील पुराजीवाश्म संशोधनाच्या दृष्टीने नर्मदा खोऱ्याला विशेष महत्त्व आहे. मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावणारी नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळते. लाखो वर्षांच्या प्रवासात नदीने निर्माण केलेल्या गाळाच्या थरांमध्ये विविध प्रागैतिहासिक प्राण्यांचे अवशेष जतन झाले आहेत. या खोऱ्यात हत्ती, गेंडे, पाणघोडे, घोडे, हरीण, म्हशी, मगरी आणि इतर अनेक प्राण्यांचे जीवाश्म आढळले आहेत. त्यांच्या अभ्यासातून प्राचीन काळातील प्राणिजीवनाची विविधता, जंगलांचा आणि गवताळ प्रदेशांचा विस्तार तसेच हवामानातील बदल समजून घेता येतात.



भारतीय उपखंडात प्राचीन काळात हत्तींसारख्या महाकाय प्राण्यांच्या अनेक प्रजाती अस्तित्वात होत्या. शिवालिक पर्वतरांगांपासून मध्य भारतातील नर्मदा खोऱ्यापर्यंत त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. गोम्फोथेरियम (Gomphotherium), डाइनोथेरियम (Deinotherium), स्टेगोडॉन (Stegodon) आणि एलिफस (Elephas) या प्राचीन प्राणिगटांचा त्यात समावेश होतो. यापैकी स्टेगोडॉन हा भारतीय उपखंडातील प्रागैतिहासिक जीवसृष्टीचा महत्त्वाचा प्रतिनिधी मानला जातो. त्याच्या दाढांवर उंच आणि जवळजवळ समांतर कंगोरे होते. या रचनेमुळे त्याला विविध प्रकारच्या वनस्पती चावून खाणे शक्य होत असे. दातांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्याचा आहार आणि अधिवास यांविषयी माहिती मिळवता येते.



स्टेगोडॉन नामॅडिकस ही प्रजाती भारतीय उपखंडात प्लाइस्टोसीन कालखंडात अस्तित्वात होती. याच काळात पॅलिओलॉक्सोडॉन नामॅडिकस (Palaeoloxodon namadicus) या मोठ्या आकाराच्या प्रागैतिहासिक हत्तीचेही अस्तित्व होते. याशिवाय एलिफस हायसुड्रिकस (Elephas hysudricus) या प्राचीन हत्तीचे अवशेषही भारतीय उपखंडात आढळले आहेत. या प्राण्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यामुळे हत्तींच्या उत्क्रांतीतील विविध टप्पे, त्यांचे भौगोलिक अस्तित्व आणि तत्कालीन पर्यावरणाशी असलेले संबंध स्पष्ट होण्यास मदत होते. मात्र, या सर्व प्रजाती आजच्या भारतीय हत्तीचे थेट पूर्वज होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.



हत्तींच्या उत्क्रांतीचा इतिहास सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातो. आफ्रिकेत आढळलेला एरिथेरियम (Eritherium) हा अत्यंत प्राचीन प्रोबॉसिडियन (Proboscidea) प्राणिगटातील प्राणी मानला जातो. त्यानंतरच्या काळात मोएरिथेरियम (Moeritherium) अस्तित्वात होता. सुमारे तीन कोटी ७० लाख वर्षांपूर्वी वावरणारा हा प्राणी आजच्या हत्तीपेक्षा आकाराने खूपच लहान होता. त्याला आजच्या हत्तीसारखी विकसित आणि लांब सोंड नव्हती. त्याची शरीररचना पाणथळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यासारखी होती.



पुढील उत्क्रांतीच्या टप्प्यांत पॅलिओमॅस्टोडॉन (Palaeomastodon), फिओमिया (Phiomia) आणि गोम्फोथेरियम यांसारख्या प्राण्यांच्या विविध प्रजाती विकसित झाल्या. त्यांच्या शरीराचा आकार, कवटी, जबडा, सुळे आणि दाढांच्या रचनेत बदल होत गेले. काही प्राण्यांच्या वरच्या आणि खालच्या जबड्यांत सुळे होते, तर काहींच्या दातांची रचना विशिष्ट प्रकारच्या वनस्पती खाण्यास अनुकूल होती. या प्रक्रियेत हत्तींच्या उत्क्रांतीच्या अनेक स्वतंत्र शाखा निर्माण झाल्या. त्यांपैकी काही कालांतराने नामशेष झाल्या, तर काही शाखांच्या उत्क्रांतीतून आजचे हत्ती अस्तित्वात आले. त्यामुळे आधुनिक हत्तींचा इतिहास हा एका सरळ उत्क्रांतीच्या मार्गाचा परिणाम नसून अनेक शाखांनी समृद्ध झालेल्या दीर्घ प्रक्रियेचा भाग आहे.



नर्मदा खोरे केवळ प्राचीन प्राण्यांच्या अवशेषांसाठीच नव्हे, तर मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठीही महत्त्वाचे आहे. या खोऱ्यातील हथनोरा येथे १९८२ मध्ये प्रागैतिहासिक मानवाच्या कवटीचा वरचा भाग आढळला होता. या अवशेषाला ‘नर्मदा मानव’ असे संबोधले जाते. त्यानंतरच्या संशोधनात परिसरात मानवी हाडांचे इतर अवशेष आणि दगडी हत्यारेही सापडली. त्यामुळे या प्रदेशातून प्राचीन मानवाचे अस्तित्व, त्याची जीवनशैली आणि तत्कालीन पर्यावरण यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.



नर्मदेच्या खोऱ्यात नव्याने आढळलेल्या हत्तीच्या जबड्यामुळे या प्रदेशातील प्राचीन जीवसृष्टीच्या अभ्यासाला आणखी एक महत्त्वाचा दुवा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या अवशेषाचे वय ६५ लाख वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आणि तो स्टेगोडॉन नामॅडिकस प्रजातीचा असण्याची शक्यता यांची शास्त्रीय सांगड घालणे आवश्यक आहे. कारण या प्रजातीच्या ज्ञात जीवाश्मांचा कालखंड आणि सध्याच्या अवशेषासाठी सांगितलेले वय यांबाबत अधिक तपासणीची गरज आहे. त्यामुळे सविस्तर वैज्ञानिक परीक्षणानंतरच या शोधाचे नेमके महत्त्व आणि प्रागैतिहासिक इतिहासातील त्याचे स्थान स्पष्ट होणार आहे.