एसटीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर!

दोन विद्यार्थिनींना रात्री रस्त्यात उतरवलं...

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
भंडारा,
Bhandara News 'प्रवाशांच्या सेवेसाठी' आणि 'सुरक्षित प्रवास' असं ब्रीद मिरवणाऱ्या एसटी महामंडळाचा भोंगळ आणि संतापजनक कारभार भंडाऱ्यात समोर आला आहे. भंडारा ते मुंढरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना चालक आणि वाहकानं रात्रीच्या अंधारात वाटेतचं रोहा गावात उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
 

bus karbhar 
भंडारा येथून मुंढरी गावाकडं जाणारी बस क्रमांक एम.एच. 40 वाय 5008 रात्रीच्या सुमारास रोहा गावात पोहोचली. मात्र, रोहा गावातून पुढे मुंढरीला जाण्यासाठी या दोन विद्यार्थिनीशिवाय इतर कुठलाही प्रवासी बसमध्ये नव्हता. हेच कारण पुढे करत, संवेदनशीलता विसरलेल्या चालक आणि वाहकानं या दोन्ही विद्यार्थिनींना अंतिम टप्पा येण्यापूर्वीचं रात्रीच्या मिट्ट अंधारात रोहा गावातच खाली उतरवून दिलं. या संतापजनक प्रकाराची माहिती जिल्हा परिषदचे शिक्षण आणि बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांना मिळताचं त्यांनी आपला नियोजित दौरा तात्काळ रद्द केला आणि थेट रोहा गाव गाठलं.
घटनास्थळी पोहोचताच ईश्वरकर यांनी एसटी चालक आणि वाहकाला चांगलंच धारेवर धरलं. एवढंच नाही तर, त्यांनी थेट एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत या बेजबाबदार कर्मचाऱ्यांची तक्रार केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर आणि पालक वेळेत घटनास्थळी पोहोचले म्हणून मोठा अनर्थ टळला. मात्र, जर त्यांना पोहोचायला उशीर झाला असता आणि या मुलींच्या बाबतीत काही बरं-वाईट घडलं असतं, तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींना त्यांच्या नियोजित गावापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना, केवळ बसमध्ये इतर प्रवासी नसल्याचं कारण देत त्यांना अर्ध्या रस्त्यात उतरवणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी दोन मुलींना सोडून देण्याचा निर्णय घेताना चालक आणि वाहकाने त्यांच्या सुरक्षिततेचा साधा विचारही केला नाही का, असा संतप्त प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.