मुंबई
Bigg Boss 20 ‘बिग बॉस २०’चा हा आठवडा लोकप्रिय गेमर स्काउट ओपीसाठी चांगलाच वादळी ठरला आहे. आधी मित्र यंग डीएसएसोबत झालेल्या वादातून स्काउटने त्याला धक्का दिला. या प्रकाराची गंभीर दखल घेत बिग बॉसने शिक्षा म्हणून त्याला संपूर्ण पर्वासाठी नॉमिनेट केले. त्यानंतर लव गिलसोबतही त्याचे बिनसले आणि लवने त्याच्याशी बोलणे बंद केले. या सगळ्या घडामोडींनंतर आता ‘वीकेंड का वार’मध्ये खुद्द शोचा सूत्रसंचालक सलमान खान याने स्काउट ओपीची चांगलीच शाळा घेतली आहे. यंग डीएसएसोबत झालेल्या धक्काबुक्कीवरून सलमानने त्याला जाब विचारत त्याच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. या भागाचा प्रोमो सध्या चर्चेत आहे.

‘वीकेंड का वार’च्या प्रोमोमध्ये सलमान खान स्काउटला थेट त्याच्या वर्तनाबाबत प्रश्न विचारताना दिसतो. शोमध्ये जसे वागला, तसेच वर्तन तो बाहेरच्या जगातही करतो का, असा सवाल सलमानने केला. मुलांमध्ये धक्काबुक्की चालते, अशी स्काउटची मानसिकता असू शकते; मात्र बिग बॉसच्या घरात अशा प्रकारांना अजिबात थारा नाही, असे सलमानने स्पष्ट केले. या घरात मनाने, बुद्धीने किंवा शब्दांनी खेळण्याची मुभा आहे; पण शारीरिक धक्काबुक्की खपवून घेतली जाणार नाही, असेही त्याने सुनावले.
यंग डीएसएला धक्का दिल्यानंतरही त्याला वारंवार चिथावणी देण्यामागे स्काउटचा नेमका हेतू काय होता, असा सवाल सलमानने उपस्थित केला. ‘इतका कसला अहंकार स्काउट? यंगकडून तुला नेमकी कोणती प्रतिक्रिया अपेक्षित होती? तू त्याला ज्या पद्धतीने धक्का दिलास आणि सतत भडकवत राहिलास, त्याने तुझा चेहराच फोडावा, अशी तुझी अपेक्षा होती का?’ अशा शब्दांत सलमानने स्काउटला सुनावले. या प्रसंगामुळे वीकेंडच्या भागात स्काउटला सलमानच्या कडक प्रश्नांना सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केवळ घरातील वर्तनावरच नव्हे, तर स्काउटच्या लोकप्रियतेवर आणि त्याच्या गेमिंग क्षेत्रातील प्रभावावरही सलमानने भाष्य केले. स्काउट हा लोकप्रिय गेमर असून त्याला मोठ्या प्रमाणात चाहते आणि फॉलोअर्स आहेत. विशेषतः तरुण चाहते त्याला आदर्श मानतात. अशा परिस्थितीत त्याने सार्वजनिक व्यासपीठावर कोणते वर्तन करावे, याची जबाबदारीही त्याच्यावर आहे, असे सलमानने अधोरेखित केले. देशाचे प्रतिनिधित्व करणारा गेमर अशा प्रकारे लोकांना प्रेरित करत असेल, तर त्याच्याकडून प्रेरणा घेणाऱ्यांना शुभेच्छाच द्याव्या लागतील, असा उपरोधिक टोला सलमानने लगावला. लोकप्रियतेसोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीवही त्याने स्काउटला करून दिली.
दरम्यान, स्काउट ओपी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. लव गिलसोबत झालेल्या वादानंतर त्याने स्वतःचे केस पूर्णपणे काढून टक्कल केले. मात्र, हा निर्णय लवसोबतच्या भांडणामुळे घेतला नसल्याचे स्काउटने स्पष्ट केले आहे. तरीही बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडून त्याच्या या कृतीचा संबंध लवसोबतच्या वादाशी जोडला जात आहे. आम्रपाली दुबे, यंग डीएसए आणि काझी तौकीर यांनी स्काउट मानसिक तणावातून जात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. लवसोबतच्या भांडणानंतरच त्याने टक्कल केल्याचेही सदस्यांचे म्हणणे होते.
याच भागात स्काउट भावूक होऊन ढसाढसा रडतानाही दिसला. त्यावेळी यंग डीएसएने त्याला आधार दिला. एकीकडे मित्रासोबतचा वाद, दुसरीकडे लव गिलसोबतचे बिघडलेले संबंध आणि आता सलमान खानची कानउघाडणी, अशा अनेक घटनांमुळे स्काउट ओपीची बिग बॉसच्या घरातील वाटचाल सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सलमानच्या सुनावणीनंतर स्काउट आपल्या वागण्यात बदल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.