बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची चाहूल

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
Cyclone Akwan Alert
बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, पुढील २४ तासांत त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात (डीप डिप्रेशन) होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. त्यानंतर ही हवामान प्रणाली उत्तर-वायव्य दिशेने सरकेल. १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळाला ‘अकवान’ असे नाव देण्यात आले असून, हे नामकरण इराणने केले आहे.




हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, शनिवारी सकाळी ५.३० वाजता दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर स्पष्ट झालेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. या प्रणालीच्या प्रभावामुळे अंदमान समुद्र, अंदमान-निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागरातील मोठ्या भागात हवामान बिघडण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. १७ नोव्हेंबरपासून वाऱ्यांचा वेग वाढून ताशी ८० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस वाऱ्यांचा हा वेग कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

समुद्रात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, समुद्रात असलेल्या मच्छीमारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत किनाऱ्यावर परतावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.


अंदमान-निकोबार प्रशासन सज्ज


संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल दिनेश शर्मा यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले, “आमचे आपत्ती नियंत्रण दल नेहमीच पूर्णपणे सज्ज असते. बेटांवर नौदल, हवाई दल आणि भूदल या तिन्ही सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती रोखणे आपल्या हातात नसले, तरी आपत्तीची तीव्रता वाढवणाऱ्या परिस्थिती निर्माण होऊ नयेत, याची काळजी आम्ही घेतो. दुर्दैवाने आपत्ती उद्भवलीच, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने केल्या जातात. सध्या काळजी करण्यासारखे काहीही नाही. सामान्यतः लहान-मोठी चक्रीवादळे येत असतात.”


अलीकडच्या काही आठवड्यांत बंगालच्या उपसागराच्या परिसरात निर्माण होणारी ही तिसरी मोठी हवामान प्रणाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ‘अर्नब’ आणि ‘मुरसु’ या चक्रीवादळांनी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडक दिली होती.२८ ऑक्टोबर रोजी ‘अर्नब’ चक्रीवादळाने नरसापूरजवळ अतितीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात किनारा ओलांडला होता. त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटर होता, तर वाऱ्यांचे झोत ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. या चक्रीवादळामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर ३ नोव्हेंबरच्या सकाळी ‘मुरसु’ चक्रीवादळाने दक्षिण आंध्र प्रदेशातील ओंगोलजवळ गंभीर चक्रीवादळाच्या स्वरूपात किनारपट्टी ओलांडली. त्या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर, तर झोतांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत होता. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ५ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह तेलंगणातील काही भागांत अतिवृष्टी झाली होती. आता ‘अकवान’च्या संभाव्य निर्मितीमुळे बंगालच्या उपसागर परिसरातील हवामानावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.