दिल्ली
Yamuna River दिल्लीतील यमुना नदीत मोठ्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली असतानाच, या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून कथित खोटी माहिती पसरवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील सोनिया विहार परिसरात यमुना नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी गोपालपूर येथून आरोपीला अटक करण्यात आली. दिल्ली सरकारच्या सिंचन आणि पूर नियंत्रण विभागाने दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मृत माशांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १२ नोव्हेंबर रोजी वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रातून एक व्हिडीओ कथितरीत्या सोशल मीडियावर प्रसारित केला होता. यमुना नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याच्या बातम्या समोर येत असतानाच हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३५३ अंतर्गत सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे, कलम २४० अंतर्गत खोटी माहिती देणे आणि कलम ३५२ अंतर्गत शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, या आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नदीत विषारी रासायनिक कचरा सोडल्याचा संशय
सोनिया विहारजवळ यमुना नदीत मोठ्या संख्येने मृत मासे तरंगत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर दोन दिवसांनी ही अटकेची कारवाई झाली. या व्हिडीओमुळे नदीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यमुनेत विषारी रासायनिक कचरा सोडला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेवरून दिल्लीतील राजकीय वातावरणही तापले आहे. दिल्लीचे जलमंत्री प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षावर (आप) गंभीर आरोप केला आहे. भाजप सरकार आणि यमुना स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ‘आप’ने नदीत मृत मासे टाकल्याचा आरोप वर्मा यांनी केला. मात्र, ‘आप’ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. यमुना स्वच्छतेबाबत सरकार करीत असलेल्या दाव्यांवर पक्षाने प्रश्न उपस्थित केले असून, नदीतील प्रदूषणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
छठपूजेच्या तोंडावर घटना; चर्मोद्योगातील सांडपाण्यावरही संशय
दरम्यान, दिल्ली जल मंडळानेही यमुनेत रसायने सोडल्याबाबत सोशल मीडियावर कथित दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी हथिनीकुंड बॅरेजजवळ असलेल्या एका चर्मोद्योग कारखान्यातून यमुनेत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू होत असल्याचा आरोप केला आहे. उत्तर दिल्लीतील बुराडी परिसरात यमुना नदीच्या किनाऱ्यावर शेकडो मृत मासे आढळल्यानंतर महिनाही उलटला नसताना पुन्हा अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे, छठपूजेच्या अगदी आधी ही घटना घडल्याने नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.