गडचिरोली
devendra fadnavis बंदुकीच्या जोरावर हिंसाचार घडविणाऱ्या सशस्त्र नक्षलवादापेक्षा समाजात वैचारिक पातळीवर रुजणारा बौद्धिक नक्षलवाद अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाचे संविधान आणि प्रस्थापित व्यवस्था नाकारणारी नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न या विचारधारेतून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सशस्त्र नक्षलवादाचा प्रभाव कमी होत असला, तरी वैचारिक पातळीवर निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा प्रवृत्तींविरोधात लढा देताना संविधानाच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समान संधी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे संविधानाची मूल्ये आणि त्यातील तरतुदी समाजापर्यंत सातत्याने पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही काळात झालेल्या बदलांची माहिती देशभर पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यावरही मुख्यमंत्र्यांनी भर दिला. देशाच्या विविध भागांतील कंटेंट क्रिएटर्स, लेखक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील बदलांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.या दौऱ्यात केवळ जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि निसर्गसंपदेची माहिती देण्यात आली नाही, तर आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी तसेच नक्षलग्रस्त कुटुंबांशीही या प्रतिनिधींनी संवाद साधला. जिल्ह्यातील उद्योग, खाणकाम, कौशल्य विकासाचे उपक्रम आणि नैसर्गिक संपत्तीचीही त्यांनी पाहणी केली. या अनुभवांच्या माध्यमातून गडचिरोलीचे बदलते चित्र देशातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची विकासाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल व्यापक स्तरावर पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नक्षलवादमुक्तीची प्रक्रिया, जिल्ह्यातील विकासकामे आणि बदलती सामाजिक परिस्थिती यांसोबतच वैचारिक पातळीवरील आव्हानांवरही फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले.