विद्यार्थ्यांनो, डिजिटल शिक्षणातून संधींचे सोने करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाज्योती’ आणि ‘वनार्टी’च्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबलेटचे वितरण

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

नागपूर,
fadnavis-mahajyoti-vanarti-tabletsआजच्या डिजिटल युगात गुणवत्तेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून डिजिटल माध्यमातून ज्ञानाची नवी दालने खुली झाली असून, विद्यार्थ्यांसाठी शिकण्याच्या आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाइन व्याख्याने, डिजिटल अभ्यास साहित्य, आधुनिक संदर्भ साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक व्यापक व सुलभ झाले आहे. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमांचा मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी उपलब्ध डिजिटल साधनांचा विधायक वापर करून ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करावा. या संधींचे सोने करीत स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करावे आणि आपल्या गुणवत्तेच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठावीत, असे आवाहन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 

tablet bt cm 
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षण (२०२६-२८) अंतर्गत नागपूर विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी टॅबलेटचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री सचिवालयात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी 'महाज्योती'चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे आणि 'वनार्टी'चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रामीण तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य आवश्यक असते. शासनाच्या प्रशिक्षण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेत आपल्या शैक्षणिक ध्येयापर्यंत पोहोचावे. टॅबलेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्याख्याने, अभ्यास साहित्य, सराव परीक्षा आणि विविध शैक्षणिक संदर्भ साधनांचा लाभ घेता येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षणाच्या पद्धती बदलत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञानही आत्मसात करावे. उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करून आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे जावे आणि आपल्या यशातून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणा निर्माण करावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत 'महाज्योती'चे लाभार्थी विद्यार्थी निशांत राम राऊत, किर्तिका मंगेश नाकाडे, नैतिक नरेंद्र नवघरे आणि दर्ष संजय मेहर, तर 'वनार्टी'चे लाभार्थी विद्यार्थी चेतन सुधीर लोंढे, विधी एकनाथ पवार आणि क्रितीका मंगेश नाकाडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबलेट प्रदान करण्यात आले.