मुंबई
Aditya Kripalani चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य कृपालानी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची मुलगी अनुराधा पांडे हिचे कर्करोगामुळे निधन झाले. या दुःखद घटनेची माहिती आदित्य यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. मुलीच्या आठवणींना उजाळा देणारा एक भावुक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी, ‘जगातील सर्वांत चांगली मुलगी. आमच्यासाठी,’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यातून मुलीला गमावल्याचे दुःख आदित्य यांनी व्यक्त केले आहे.

व्हिडीओमध्ये आदित्य कृपालानी यांना भावना अनावर झाल्याचे दिसते. मुलीच्या निधनाची बातमी नेमक्या कोणत्या शब्दांत सांगावी, हेच समजत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनुराधाला चौथ्या टप्प्यातील ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मुलाला किंवा मुलीला कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतरही पालकांच्या मनात आपल्या मुलाला काहीही होणार नाही, तो या संकटातून बाहेर पडेल, अशी आशा कायम असते. ‘सर्कल ऑफ लाइफ’सारखी गाणी ऐकतानाही आपले मूल आपल्याला सोडून जाणार नाही, अशीच अपेक्षा मनात असते, असे आदित्य यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात असे घडेल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. अशा प्रसंगातून जाताना माणसाला आपल्या सर्व श्रद्धा आणि विश्वासांचा पुन्हा विचार करावा लागतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जगात अनेकांनी आपली मुले, भाऊ-बहीण किंवा जवळची माणसे गमावली आहेत. मात्र, असे दुःख आपल्याही वाट्याला येऊ शकते, हे कोणालाही मान्य करावेसे वाटत नाही, असे आदित्य यांनी नमूद केले. ज्या कुटुंबांनी कर्करोगामुळे आपल्या मुलांना गमावले, त्यांनाही आज आपण अनुभवत असलेल्याच वेदनांमधून जावे लागले असेल, याची जाणीव आता होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कठीण प्रसंगातून जात असतानाच आदित्य यांनी नागरिकांना आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. आपल्या आजूबाजूचे वातावरण, मानसिक आनंद, दैनंदिन जीवनातील सवयी, आहार आणि शारीरिक आरोग्य याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, कारण अशा प्रकारचे संकट कोणाच्याही आयुष्यात येऊ शकते, असा संदेशही त्यांनी दिला.
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आदित्य यांनी धीर दिला. या लढाईत तुम्ही एकटे नाही. अनेक जण अशाच कठीण परिस्थितीतून जात आहेत. या प्रवासातील वेदना खऱ्या आहेत आणि दुःखही तितकेच खरे आहे, असे सांगत त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.मुलीच्या निधनानंतर पालक म्हणून हे वास्तव स्वीकारण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आदित्य यांनी सांगितले. या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सोपा नसला, तरी दया आणि प्रेमाच्या भावनेने आयुष्याचा पुढील प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे, यापूर्वीही आदित्य कृपालानी आपल्या भावनिक स्वभावामुळे चर्चेत आले होते. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक २’ या चित्रपटाचा आढावा घेताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. चित्रपटातील अभिनय आणि कथानकाबद्दल बोलताना ते भावुक झाले होते. आता मुलगी अनुराधाच्या निधनाने त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना धीर देत श्रद्धांजली वाहिली आहे.