वन अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचा खजिना!

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
भोपाळ
forest officer
मध्य प्रदेशातील वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारीवरून लोकायुक्त पथकाने मोठी कारवाई केली आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पात कार्यरत उपविभागीय अधिकारी संजीव कुमार शर्मा यांच्या पचमढी आणि छिंदवाडा येथील निवासस्थाने तसेच कार्यालयावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे ७.६ कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली असून, त्यामध्ये अडीच किलोहून अधिक सोने, सुमारे १.६ किलो चांदी, २६ लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम, दोन हॉटेल-रिसॉर्ट आणि जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित २८ दस्तऐवजांचा समावेश आहे.



१४ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास लोकायुक्तांच्या दोन पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरू केली. लोकायुक्त पोलीस अधीक्षक सुनील पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पचमढी येथील शर्मा यांचे शासकीय निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतली. दुसऱ्या पथकाने छिंदवाडा येथील प्रोफेसर कॉलनीमधील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी तपासणी केली. नर्मदापुरम येथील विशेष न्यायालयाने दिलेल्या शोध वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

शर्मा यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. प्राथमिक पडताळणीत त्यांची मालमत्ता ज्ञात उत्पन्नापेक्षा २२८ टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळले होते. मात्र, छाप्यांदरम्यान मिळालेली कागदपत्रे आणि मालमत्तेच्या प्राथमिक तपासणीनंतर हे प्रमाण सुमारे ५६० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे लोकायुक्तांचे उपअधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.

छाप्यांमध्ये एकूण २६ लाख ३६ हजार ८०० रुपयांची रोकड, २ हजार ५२७.९२४ ग्रॅम सोने आणि १ हजार ६५६ ग्रॅम चांदी आढळली. सोन्याची अंदाजित किंमत सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये, तर चांदीची किंमत सुमारे २ लाख ९४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. छिंदवाडा येथील घरातून ३ लाख १ हजार ८०० रुपये रोख, ९२७.९२४ ग्रॅम सोने आणि ३५६ ग्रॅम चांदी मिळाली. तर पचमढी येथील शासकीय निवासस्थानातून २३ लाख ३५ हजार रुपये रोख, १ हजार ६०० ग्रॅम सोने आणि १ हजार ३०० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

या कारवाईत दोन हॉटेल आणि रिसॉर्टशी संबंधित कागदपत्रेही हाती लागली आहेत. मटकुली येथील ‘इकोटेल हॉटेल अँड रिसॉर्ट’ची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. हे रिसॉर्ट २०१६-१७ मध्ये घेतल्याचे सांगितले जाते. तर पचमढी येथील ‘सेरेनिटी द व्हिला’ या मालमत्तेची अंदाजित किंमत एक कोटी रुपये असून, ती २०१४ मध्ये खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही मालमत्तांचे अधिकृत मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही.

शर्मा यांच्याशी संबंधित जमिनीच्या व्यवहारांची २८ कागदपत्रे आणि करारही तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहेत. याशिवाय महिंद्रा स्कॉर्पिओ, महिंद्रा केयूव्ही, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि स्कूटर अशा चार वाहनांची किंमत सुमारे ३१ लाख २० हजार रुपये असल्याचे प्राथमिक मूल्यांकन करण्यात आले आहे. घरातील वस्तू आणि इतर कौटुंबिक मालमत्तेचे मूल्य सुमारे ५० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. छिंदवाडा आणि होशंगाबाद परिसरातील भूखंड, दुकाने तसेच अन्य मालमत्तांशी संबंधित कागदपत्रांचीही तपासणी सुरू आहे.

छिंदवाडा येथील घरात दोन कपाटे कुलूपबंद अवस्थेत आढळली असून, त्यांची चावी शर्मा यांच्याकडे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या बँक खात्यांची, गुंतवणुकीची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. हॉटेल, रिसॉर्ट, जमीन, भूखंड आणि दुकानांचे सविस्तर मूल्यांकन झाल्यानंतर मालमत्तेचा एकूण आकडा आणखी वाढण्याची शक्यता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.