समुद्रपूर,
girad-khursapar-jungle-safariतालुक्यातील गिरड-खुर्सापार जंगलात वाघांचा वाढता वावर, नैसर्गिक विविधता, तलाव, नाले, गवताळ प्रदेश लक्षात घेता मार्चपासून जंगल सफारी प्रकल्पाचे काम सुरू झाले. अवघ्या ३ महिन्यांत कामही पुर्णत्वास आले. आता लवकरच जंगल सफारी सुरू होईल, अशी स्थानिक नागरिक व वन्यप्रेमींना अपेक्षा असताना अद्यापही जंगल सफारीचे उद्घाटन झाले नसल्याने येथील वाघांचे दर्शन व निर्सगरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी वन्यप्रेमींसह पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
येथील वाघांचा वाढता वावर, नैसर्गिक विविधता पाहून आ. समीर कुणावार यांनी याठिकाणी जंगल सफारी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहाय्यक वनरक्षक हरिष सरोदे यांच्या प्रयत्नानंतर वन्य प्रेमींसाठी जंगल सफारी प्रकल्पाचे काम तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी मार्च २०२६ मध्ये युद्ध पातळीवर सुरू करून जंगलामध्ये ३२ किमीहून अधिक रस्त्यांचे काम, स्वागत गेट, शौचालय, वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे टाके आदी कामे अवघ्या तीन महिन्यात पूर्ण केले. त्यानंतर याच जोमाने उर्वरित काम नव्याने आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी पूर्ण केले.
दोन वर्षांपूर्वी गिरड-खुर्सापार परिसरात दहशत माजवणारी वाघीण आता त्याच जंगलाची राणी म्हणून ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी या वाघिणीने ४ पिलांना जन्म दिला असून तिचा खुर्सापारच्या जंगलात संचार सुरू आहे. जनावरांवरील हल्ले आणि मानवी वस्तीजवळील वावरामुळे या संपूर्ण कुटुंबाचे दुसऱ्या जंगलात स्थलांतरण करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे वनविभागाने तीनही पिलांना जेरबंद केले होते.
या सर्व घडामोडींनंतरही वाघिणीला गिरड-खुर्सापारच्या जंगलात अधिक सुरक्षित आणि पोषक अधिवास लाभला. अवघ्या सहा महिन्यांची पिल्लं आता आईच्या सान्निध्यात जंगलात बागडत असून, गिरडच्या वनराईत नव्या जीवनाची चाहूल लागली आहे. आता फक्त या जंगल सफारी प्रकल्पाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट आहे.
प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. काही शिल्लक असून ते काम लवकर पूर्ण करून एक-दोन महिन्यांत जंगल सफारी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी दिली.