,
गोंदिया,
gondia-railway-ticket-checking-driveविनातिकीट तसेच अनियमित प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने गोंदिया रेल्वे स्थानकावर १२ नोव्हेंबर रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली, ज्यामध्ये २४ रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. यात विविध प्रकारची ५८४ प्रकरणे उघडकीस आली असून, २ लाख ९४ हजार ७४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक वाणिज्य प्रबंधक अरबिंद कुमार साव यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीत विनातिकीट प्रवासाची २१५ प्रकरणे आढळून आली. त्यातून १ लाख ७९ हजार ९४० रुपये दंड वसूल करण्यात आला. अनियमित तिकिटांद्वारे प्रवास केल्याच्या १२३ प्रकरणांत ८९ हजार ३५५ रुपये, तर विनाबुक लगेजच्या २४६ प्रकरणांत २५ हजार ४५० रुपये दंड आकारण्यात आला. या मोहिमेत दोन वाणिज्य निरीक्षक, १० मुख्य तिकीट निरीक्षक, ३२ चल तिकीट तपासणी निरीक्षक आणि तीन एमटीएस कर्मचार्यांसह वाणिज्य विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. दरम्यान, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासोबतच प्रवाशांना रेल्वे नियमांची जाणीव करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रवाशांनी गैरसोय आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह यांनी केले आहे.
मोहिम पुढेही सुरु राहणार...
रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करताना आवश्यकतेनुसार फलाट तिकीट घेणे, एका फलाटावरून दुसर्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करणे तसेच रेल्वे परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले असून अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.