होर्मुझ,
hormuz-three-ships-fireहोर्मुझ सामुद्रधुनीमध्ये शनिवारी भयंकर अपघात झाला. तीन तेल जहाजांवर आगडोंब उसळला. समुद्रात अंथरण्यात आलेल्या सुरुंगांना ही जहाजे धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि तिन्ही जहाजे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. इराणच्या लष्करानेच याबद्दलची माहिती दिली आहे.
शनिवारी सकाळी एक तेलवाहू जहाज होर्मुज सामुद्रधुनीतील पूर्वेस असलेल्या सुरुंगांवर जाऊन धडकले. तर इतर दोन तेल जहाजे दुपारी सुरूंगांवर आदळली. त्यानंतर तिन्ही जहाजांना आग लागली. या घटनांनंतर इराणच्या लष्कराने इतर तेल आणि नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या जहाजांना इशारा दिला. त्यानंतर दोन जहाजांना मार्ग बदलून फारसच्या खाडीकडे परत जावे लागले.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, शनिवारी सकाळी पहिले जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून जात होते. हे जहाज पेरण्यात आलेल्या सुरूंगावर जाऊन आदळले. या घटनेनंतर आणखी दोन जहाजे सुरूंगांवर धडकले. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने नौदलाच्या हवाल्याने वृत्त दिले की, तिन्ही जहाजांना आग लागली आहे. दुसरीकडे आयआरएनए वृत्तवाहिनीनेही इराण लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की, दुपारी ज्या दोन तेलवाहू जहाजांना आग लागली, ती जहाजे बंदी असलेल्या समुद्र मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते.
बंदी घालण्यात आलेल्या समुद्रीमार्गाचाच वापर दोन जहाजांनी केला आणि पुढे जात असतानाच ते सुरूंगावर आदळले. धडक दिल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि दोन्ही जहाजांना आग लागली, असे इराणच्या लष्कराने म्हटले आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने रविवारी पहाटे दिलेल्या वृत्तानुसार, तीन जहाज सुरुंगावर आदळून आग लागल्याच्या घटनेनंतर आणखी दोन जहाज त्याच मार्गाने जात होती. त्यांना इशारा देण्यात आला. त्या जहाजांनी मार्गात बदल केला आणि पुढे जाण्याऐवजी दोन्ही जहाजे माघारी फिरले.