महामार्गांवरील टोल वसुलीचा विक्रम!

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
toll collection
देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोल वसुलीने ऑक्टोबर २०२६ मध्ये नवा उच्चांक गाठला आहे. या महिन्यात टोलच्या माध्यमातून ६ हजार ६४० कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला. आतापर्यंतची ही सर्वाधिक मासिक टोल वसुली ठरली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा टोल महसुलात तब्बल १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये सुमारे ५ हजार ७१५ कोटी रुपये जमा झाले होते.



यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात ६ हजार १८५ कोटी रुपयांची विक्रमी मासिक टोल वसुली झाली होती. मात्र, ऑक्टोबरमधील महसुलाने हा आकडाही मागे टाकला आहे. सध्याच्या महसूलवाढीचा वेग कायम राहिल्यास २०२६ या वर्षात देशातील एकूण टोल वसुली सुमारे ७४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टोल वसुलीतील वाढीबरोबरच पैसे भरण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. रोख रकमेचा वापर झपाट्याने कमी होत असून डिजिटल व्यवहारांना वाहनचालकांकडून पसंती मिळत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये टोल प्लाझांवर रोख स्वरूपात ८४ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा ऑक्टोबरमध्ये हा आकडा घसरून केवळ चार कोटी रुपयांवर आला. याउलट, यूपीआयच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२६ मध्ये सुमारे १०० कोटी रुपयांचे टोल पेमेंट झाले. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२५ मध्ये यूपीआयद्वारे टोल वसुलीची नोंद नव्हती.

टोल भरण्यासाठी फास्टॅग आणि यूपीआयचा वापर वाढवण्याबाबत सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीच्या विस्तारामुळे टोल नाक्यांवरील रोख व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर डिजिटल पेमेंटच्या सुविधेमुळे वाहनचालकांनाही टोल भरणे अधिक सोयीचे झाले आहे.

टोल वसुलीतील रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रोख व्यवहार बंद झाल्यास आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल. अधिकाधिक वाहनचालक फास्टॅग वार्षिक पास घेत असल्याचेही सकारात्मक चित्र असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकीकडे महामार्गांवरील वाहतुकीशी संबंधित महसुलात वाढ होत असताना दुसरीकडे डिजिटल पेमेंटचा विस्तारही वेगाने होत आहे. टोल वसुलीतील विक्रमी आकडे आणि रोख व्यवहारांमध्ये झालेली घट यामुळे देशातील महामार्गांवरील टोल व्यवस्थेत होत असलेला बदल अधोरेखित झाला आहे.