बीड
Indian Air Force Soldier गेवराई तालुक्यातील गढी परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोविंद भागवत नेहरकर (वय ३०, रा. ढोकवजगाव) असे मृत जवानाचे नाव आहे. या अपघातात त्यांचे सख्खे भाऊ गोपाळ नेहरकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशसेवेत कार्यरत असलेल्या गावच्या तरुण सुपुत्राचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ढोकवजगावसह संपूर्ण गेवराई तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद नेहरकर आणि त्यांचे भाऊ गोपाळ हे दोघेही एकाच दुचाकीवरून आपल्या मूळ गावी जात होते. प्रवासादरम्यान गेवराई तालुक्यातील गढी परिसरात त्यांच्या दुचाकीची एका कारशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही भाऊ रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच हवाई दलातील जवान गोविंद नेहरकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ गोपाळ हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी गोपाळ नेहरकर यांना त्वरित गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृत जवान गोविंद नेहरकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या गोविंद नेहरकर यांच्या निधनाने नेहरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच अपघातात एका भावाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. या अपघातप्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करीत आहेत.