पुणे,
indigo-flight-emergency-landing-puneपुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याची गंभीर घटना घडली आहे. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाची चाके आत न जाता बाहेरच अडकून राहिली होती. या आपत्कालीन परिस्थितीमुळे पुणे विमानतळावर काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे विमानाचे सुखरूप आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, विमानामधील सर्व १९२ जण सुखरूप आहेत.
उड्डाणानंतर लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान क्रमांक 6E 0623 पुण्यातून गुवाहाटीच्या दिशेने उड्डाण करत होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची चाके नेहमीप्रमाणे आत न जाताच बाहेरच अडकून राहिल्याचं पायलटच्या लक्षात आलं. हा तांत्रिक बिघाड अत्यंत धोकादायक असल्याने विमानाला पुन्हा पुणे विमानतळावरच उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाकडून पुणे विमानतळावर तत्काळ 'फुल इमर्जन्सी' घोषित करण्यात आली. विमानतळावर अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या. सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी या विमानाचे पुणे विमानतळावर अत्यंत सुरक्षितरीत्या लँडिंग करण्यात आले.
विमानामध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून एकूण १९२ जण होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासानंतर, इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांचा पुढील प्रवास सुरळीत पार पाडण्यासाठी बंगळुरूहून एका पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.