उत्तर प्रदेश
Kanpur Businessman Son उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका २२ वर्षीय तरुणाचा अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संभव खंडेलवाल असे मृत तरुणाचे नाव असून, तो एका प्रतिष्ठित पेपर व्यावसायिकाचा आणि दैनिक वृत्तपत्राच्या मालक-संपादकाचा एकुलता एक मुलगा होता. १४ नोव्हेंबर रोजी सिंहपूर येथील रुद्रा ग्रीन्स अपार्टमेंटमध्ये तो आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर तो इमारतीखाली पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने जवळच्या पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला ही उंचावरून पडल्याने झालेली दुर्घटना असल्याचे मानले जात होते. मात्र, मृतदेहावरील जखमांच्या खुणा पाहून कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संभवला मारहाण करून अपार्टमेंटमधून खाली ढकलण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे, तरुणीच्या मामाने पाय घसरून हा अपघात झाल्याचा दावा केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रकरणाचे गूढ वाढले असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करीत आहेत.

मैत्रिणीला भेटण्यासाठी घरातून निघाला, अपार्टमेंटमध्ये घडली दुर्घटना
कानपूरमधील कौशलपुरी येथील आर.के. नगर परिसरात राहणारे विशाल खंडेलवाल यांचा ‘गुरु कृपा पेपर फर्म’ या नावाने कागदाचा मोठा व्यवसाय आहे. याशिवाय ते एका दैनिक वृत्तपत्राचे मालक आणि संपादक आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी प्रीती आणि मुलगा संभव असा परिवार आहे. मुलगी काव्याचे लग्न झाले आहे. २२ वर्षीय संभव वडिलांच्या व्यवसायातही मदत करीत होता.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, संभव १५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास कार घेऊन एका मित्राला भेटण्यासाठी घरातून निघाला होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या मोबाइलवरून कुटुंबीयांना फोन आला. संभव रुद्रा ग्रीन्स अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली पडला असून, त्याला पारस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालय गाठले; मात्र तोपर्यंत संभवचा मृत्यू झाला होता.
संभव अपार्टमेंटमधील बी-२ टॉवरच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. ही तरुणी तिची आई आणि लहान भावासोबत तेथे राहते. घटनेच्या वेळी तरुणीचा मानलेला मामाही फ्लॅटमध्ये उपस्थित होता. फ्लॅटमध्ये असलेल्या सर्वांची चौकशी करून नेमके काय घडले, याची माहिती पोलिस घेत आहेत.तरुणीच्या मामाने पोलिसांना वेगळीच माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संभव आणि त्यांच्या भाचीची मैत्री होती. यापूर्वीही तो अनेकदा तिला भेटण्यासाठी अपार्टमेंटमध्ये आला होता. दिवाळीनिमित्त तरुणी मुंबईहून घरी आली होती. त्यानंतर संभवचे तिच्याकडे येणे-जाणे वाढले होते.
घटनेच्या दिवशी घरात मामा, त्यांची भाची आणि लहान भाचा असे तिघेच उपस्थित होते. कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. सर्वजण कॉफी पिण्यासाठी बाहेर जाण्याचा विचार करीत होते. त्याचदरम्यान संभव आणि लहान मुलगा फ्लॅटमध्ये चेंडूने खेळत होते. खेळताना चेंडू बाल्कनीच्या दिशेने गेला. तो पकडण्यासाठी संभव धावत गेला. त्याचवेळी दिवाळीत लावलेल्या पणत्यांमधील तेल जमिनीवर सांडले होते. त्या तेलावर त्याचा पाय घसरला आणि तो बाल्कनीतून खाली पडला, असा दावा मामाने केला आहे. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. मामाने सांगितलेल्या या अपघाताच्या कथनाची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.संभवच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा दिसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या उजव्या पायावर घासल्याच्या खुणा होत्या. तसेच कंबर, पाठ, हात आणि डोक्यावरही जखमा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ही साधी दुर्घटना नसून, संभवला मारहाण करून खाली ढकलण्यात आले असावे, अशी शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात मोबाइलवरील संभाषणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरत आहे. संभव आणि त्याच्या मैत्रिणीमधील चॅटचा डेटा डिलीट झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणीने दुपारी सुमारे दोन वाजता संभवला शेवटचा संदेश पाठवला होता. त्यात इंग्रजीत ‘डोंट कम’ म्हणजेच ‘येऊ नकोस’, असे लिहिले होते. असे असतानाही संभव अपार्टमेंटमध्ये का गेला? त्यानंतर तेथे नेमके काय घडले? त्याच्या मृत्यूमागे कोणते कारण आहे? असे प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.
घटनेची माहिती मिळताच बिठूर पोलिस, एसीपी कल्याणपूर दिलीप सिंह आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने अपार्टमेंटचा सहावा मजला, संबंधित बाल्कनी आणि संभव ज्या ठिकाणी खाली पडलेला आढळला, त्या परिसराची पाहणी केली. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनेनंतर संभवची मैत्रीण, तिची आई, लहान भाऊ आणि घटनास्थळी उपस्थित असलेला मामा अशा चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
पश्चिम विभागाचे डीसीपी एस.एम. कासिम आबिदी यांनी सांगितले की, पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे संकलित केले आहेत. तरुणीच्या कुटुंबीयांकडून पाय घसरल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे, तर संभवच्या कुटुंबीयांनी त्याला खाली ढकलल्याचा आरोप केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, कुटुंबीयांची तक्रार आणि तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे गूढ उलगडणार
संभवचा मृत्यू बाल्कनीत पाय घसरल्याने झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, हा प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहे. एका बाजूला तरुणीचा मामा दिव्यांच्या तेलावर पाय घसरल्याचा दावा करीत आहे, तर दुसरीकडे मृत तरुणाचे कुटुंबीय मारहाण करून खाली ढकलल्याचा आरोप करीत आहेत. मोबाइलवरील संभाषण डिलीट झाल्याचा दावाही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासातून मिळणारे पुरावे आणि ताब्यात घेतलेल्या चौघांची चौकशी यांनंतरच संभवच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.