पुणे
Ketan Agarwal Murder Case पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधून घेतले होते. लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतनला सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान डिजिटल पुरावे आणि महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब गोळा केले असून, सध्या या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, आरोपी सिया गोयल हिच्या जामीन अर्जावर झालेल्या युक्तिवादात तिच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

सिया गोयल हिने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाच्या समर्थनार्थ बाजू मांडताना तिच्या वकिलांनी केवळ फोनवरील संभाषण किंवा चॅटिंगच्या आधारे हत्येचा कट सिद्ध करता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. सिया अद्याप तरुण असून, खटल्याचा निकाल लागण्यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खटल्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तिला कारागृहात ठेवणे योग्य नसून जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाने न्यायालयाकडे केली.
बचाव पक्षाने जामीन अर्जात पोलिसांच्या तपासासंदर्भात चार प्रमुख आक्षेप नोंदवले आहेत. केतनच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, पोलिसांनी ज्या ठिकाणाहून केतन दरीत पडल्याचा दावा केला आहे, त्या ठिकाणावरून तो खाली पडणे शक्य नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा मुद्दा सियाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तसेच केतनच्या चुलत्याने सिया आणि चेतन यांच्या संबंधांबाबत एका मित्राकडून माहिती मिळाल्यानंतर संशयाच्या आधारे तक्रार दाखल केली होती, असा युक्तिवादही बचाव पक्षाकडून करण्यात आला.
सिया आणि चेतन Ketan Agarwal Murder Case यांच्यात झालेले फोनवरील संभाषण तसेच त्यांच्यातील चॅटिंग म्हणजे हत्येचे नियोजन होते, असे ठामपणे म्हणता येणार नाही, असा मुद्दा वकिलांनी उपस्थित केला. याशिवाय, आरोपींच्या कथित जबाबांव्यतिरिक्त सरकारी पक्षाकडे हत्येचा कट सिद्ध करणारे स्वतंत्र आणि ठोस पुरावे नसल्याचा दावाही करण्यात आला. केतनचा मृत्यू हा हत्या नसून लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढताना झालेला अपघात असू शकतो, अशी पर्यायी शक्यताही बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडली.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५ हजार ५३ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तपासादरम्यान डिजिटल पुरावे संकलित करण्यात आले असून, तीन महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. सिया गोयलच्या जामीन अर्जावर येत्या १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय या अर्जावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली होती. सुरुवातीला केतनचा मृत्यू हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या घटनेमागे हत्येचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानुसार सिया गोयल व चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. आता बचाव पक्षाने तपासातील पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर उपस्थित केलेले प्रश्न आणि सरकारी पक्षाने सादर केलेले डिजिटल पुरावे व साक्षीदारांचे जबाब यांचा विचार करून न्यायालय जामीन अर्जावर काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.