पुणे/मुंबई
CNG पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) सीएनजीही महागला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ केली असून, नवे दर रविवार, १५ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांसह सीएनजीवर धावणाऱ्या खासगी वाहनधारकांच्या खिशाला आता अधिकचा भार सहन करावा लागणार आहे.

या दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो ९१.५० रुपये झाला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सीएनजीचे दर वेगवेगळे आहेत. मुंबईत ९१.५० रुपये, पुण्यात ९९ रुपये, नाशिकमध्ये ९९.७५ रुपये, नांदेडमध्ये ९७.२५ रुपये, तर सिंधुदुर्गात ९४ रुपये प्रतिकिलो दराने सीएनजी उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये मुंबईतील सीएनजीचा दर प्रतिकिलो ८०.५० रुपये होता. ताज्या दरवाढीनंतर तो ९१.५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच वर्षातील अकरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सीएनजीच्या दरात एकूण ११ रुपयांची, म्हणजेच जवळपास १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. याच काळात एमजीएलने सीएनजीच्या किमतीत आठ वेळा वाढ केली आहे.
सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. तसेच खासगी कारसाठी सीएनजीचा वापर करणाऱ्या वाहनधारकांनाही आता इंधनासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांसाठी ही दरवाढ आणखी एक आर्थिक झटका मानली जात आहे.
दरवाढीमागे गॅस खरेदीच्या खर्चात झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेतील सुरू असलेले संकट, देशांतर्गत गॅसच्या वाटपात झालेली घट आणि महागड्या आयातित गॅसवरील वाढते अवलंबित्व यामुळे कंपनीच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, आयातित री-गॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस (आरएलएनजी) वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांशी जोडलेली असल्याने त्याच्या खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. विशेषतः सीएनजीसाठी या गॅसचा वापर वाढल्याने कंपनीच्या खरेदी खर्चावर दबाव निर्माण झाला आहे. त्यात सीएनजीची मोठी मागणीही दरवाढीमागील एक कारण असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.