अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-wathoda-woman-murderप्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या मामीचा काटा काढण्याचा कट प्रियकराने रचला. त्याने प्रेयसीच्या मामीचे दुचाकीने अपहरण करुन तिच्या पोटात चाकू भोसकून खून केला. ही थरारक घटना नागपुरातील वाठोडा परिसरात घडली. प्रियंका महेश सावरकर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून ती नंदनवनमधील गल्ली क्रमांक ५ मध्ये राहत होती. अक्षय शालिकराम कोरटे (३०, रा. नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका सावरकर यांच्या १६ वर्षीय भाची स्विटी हिला आरोपी अक्षय कोरटेने गेल्या दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले होते. दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना माहिती नव्हते. अक्षय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो स्विटीला नेहमी बळजबरीने फिरायला नेत होता. सोबत येण्यास नकार दिल्यास मारहाण करीत होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी अक्षयने स्विटीला फिरायला जाण्यासाठी विचारले. तिने नकार देताच तिला रस्त्यावरच मारहाण केली होती.
याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. ही बाब मामी प्रियंका यांना समजल्यानंतर त्यांनी अक्षयला फटकारले आणि भाचीला मारहाण न करण्याची समज दिली होती. त्यानंतर स्विटीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्यामुळे चिडलेल्या अक्षयने प्रियंका यांना धडा शिकविण्याच्या हेतूने तिचा खून करण्याचा कट रचला. त्याने धनत्रयोदशीच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास केडीके महाविद्यालयाजवळ प्रियंका यांना गाठले.
त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून वाठोड्याच्या दिशेने नेले. तेथे आधी मारहाण केली आणि नंतर हत्या करण्याच्या उद्देशाने तिच्या पोटात चाकू भोसकून खून करुन पळून गेला. आरोपी अक्षय कोरटेचा यापूर्वीपासूनच गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. सुरुवातीला हा गुन्हा वाठोडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो नंदनवन पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या घटनेमुळे नंदनवन आणि वाठोडा पोलिस ठाण्याच्या गस्त प्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.