संजय राऊतांनी काँग्रेसची गुलामगिरी सोडून पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांशी नाते जोडावे

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा नागपुरातून हल्लाबोल; उद्धव ठाकरे गटावर १२ मुद्द्यांवरून घणाघाती टीका

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
nagpur
navnath-ban-attacks-sanjay-rautशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे अंधानुकरण सोडून पुन्हा हिंदुत्व आणि ‘नेशन फर्स्ट’च्या विचारांशी नाते जोडावे, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र नवनाथ बन यांनी केले. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतानाच आई तुळजाभवानीने त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बन यांनी राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांचा गट आता राजकीय पक्ष राहिला नसून बचत गट झाला आहे. या गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण कधी होणार, याची संजय राऊत वाट पाहत आहेत, असा टोला बन यांनी लगावला. काँग्रेस आणि ठाकरे गटातील राजकीय संबंध नेमके कशाच्या आधारावर टिकून आहेत, हे राऊत यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यास आपले काय होईल, या चिंतेने राऊत अस्वस्थ असल्याची टीकाही त्यांनी केली.
छठपूजेच्या मुद्द्यावरूनही बन यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले. छठपूजा हा हिंदूंचा सण असून त्याला विरोध करण्यामागील भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट करावी. या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा आहे का, याचाही खुलासा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात रेल्वे स्थानकांवर मराठी गाणी वाजलीच पाहिजेत, ही भाजपची भूमिका असल्याचे सांगत उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा संघर्ष निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
 

ban 
                                                                             
 
 
 
 देवाभाऊंच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ या तीनही निवडणुकांमध्ये विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका करण्याऐवजी संजय राऊत यांनी आधी भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचा नगरसेवक निवडून आणून दाखवावा, असे खुले आव्हान बन यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले असून राऊत यांनी आधी स्वतःची राजकीय ताकद सिद्ध करावी, असेही ते म्हणाले.
समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड आणि मेट्रो यांसारख्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना उद्धव ठाकरे गटाने विरोध केला. समृद्धी महामार्गामुळे विदर्भाची कनेक्टिव्हिटी वाढली असून मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. विकासकामांना विरोध करणे हीच ठाकरे गटाची भूमिका राहिली असून आता ग्रीन एनर्जी प्रकल्पांनाही विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई महाराष्ट्राचीच; दुटप्पी भूमिकेवर निशाणा
‘केम छो वरळी’ आणि ‘जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशा घोषणा देताना महाराष्ट्राच्या अस्मितेची आठवण झाली नव्हती का, असा सवाल बन यांनी केला. मतांसाठी गुजराती मतदारांना साद घालायची आणि राजकीय फायद्यासाठी गुजरातच्या नावाने द्वेष पसरवायचा, ही संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून ती मराठी माणसाचीच मुंबई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भूखंड प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगताना राम मंदिराच्या मुद्द्यावर ठाकरे गटाला बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या दबावामुळे उद्धव ठाकरे गट राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहिला नाही, असा आरोप करत आता राम मंदिराच्या नावाने राजकारण करू नये, असे ते म्हणाले.
गोदावरीच्या पवित्र परिसराचे ऑइल पेंटने विद्रूपीकरण करणे निषेधार्ह असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असून धार्मिक कार्यक्रमांतून जाणीवपूर्वक द्वेष पसरवणाऱ्यांचाही शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. खंडणी मागण्याच्या गंभीर प्रकरणात मुंबई पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वावरून संभ्रम
इंडिया आघाडीमध्ये एकमताचा अभाव असून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हेही विरोधकांना ठरवता आलेले नाही. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेचा निर्णय घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना कोणी दिला, असा सवाल बन यांनी उपस्थित केला. इटली आणि भारताचे संबंध राजीव गांधी यांच्या काळापासून असल्याचे सांगत मोदी यांच्या नेतृत्वावर टीका करण्यापेक्षा विरोधकांनी स्वतःच्या नेतृत्वाचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींचे राजकारण करू नये, असा सल्ला रोहित पवार यांना देताना त्यांच्या नियंत्रणातील २५ साखर कारखान्यांना अजितदादांचे नाव देण्याचे आव्हान बन यांनी दिले. अजितदादांना केवळ पुतळ्यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या स्मरणार्थ जनहिताची कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर विविध राजकीय मुद्द्यांवरून जोरदार निशाणा साधत भाजपची भूमिका मांडली