देवळी,
nayara-energy-workers-protestनिमगाव येथील नायरा एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये सात वर्षांपासून सेवा देणार्या पाच चालकांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप जागृत स्वाभिमानी कामगार संघटनेने केला आहे. संबंधित कंत्राटदाराकडून कामगारांच्या वेतनाबाबत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात संघटनेच्या वतीने ३० रोजी सकाळी ८ वाजता नायरा एनर्जी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात संघटनेने १३ रोजी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.
निवेदनात नमुद केल्यानुसार, सात वर्षांपासून पाच चालक कंपनीच्या कामासाठी सेवा देत होते. मात्र, त्यांच्या हक्काच्या पैशांबाबत अन्याय झाल्याची बाब समोर आली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून कामगारांच्या हक्कांच्या पैशांमध्ये आर्थिक अनियमितता करण्यात आली. याविरोधात कामगारांनी थकीत रक्कम व एरियर्सची मागणी केली होती. याची दखल कामगार आयुक्तांनी घेतली होती. तसेच आ. बकाने यांनीही लक्ष घालून संबंधित कामगारांना त्यांचे थकीत वेतन व प्रलंबित एरियर्स मिळवून देण्याबाबत निर्देश दिले होते.
विशेष म्हणजे, कामगार आयुक्त मंडळ व आमदारांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची थकीत रक्कम पूर्णपणे परतफेड करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. पण, त्यानंतरही कामगारांना न्याय मिळालेला नाही. उलट कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कामगारांना तत्काळ कामावर घेण्यात यावे, सात वर्षांतील कंत्राटदाराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून कामगारांचे थकीत वेतन, हक्काची रक्कम व एरियर्स तातडीने अदा करावे, कंपनीत कार्यरत कामगारांना डेली वेजेसनुसार योग्य मोबदला देण्यात यावा, कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्या, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.