“माझं नाव, माझी ओळख… परवानगीशिवाय वापराल तर थेट कारवाई!

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
मुंबई
rupali chakankar राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या नावासह छायाचित्र, ओळख आणि वैयक्तिक शैलीची अधिकृत ट्रेडमार्क नोंदणी केल्याची माहिती दिली आहे. यापुढे त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय या गोष्टींचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर करून फोटो, व्हिडीओ, रील्स अथवा जाहिरातविषयक साहित्य तयार करणाऱ्यांविरोधात फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.





चाकणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, नाव, छायाचित्र आणि वैयक्तिक शैलीची ट्रेडमार्क नोंदणी करण्यामागील नेमके कारण त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलेले नाही. तसेच हा इशारा नेमका कोणाला उद्देशून देण्यात आला आहे, याचाही स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमागील संभाव्य कारणे आणि इशाऱ्याचा रोख कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.



‘माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आली आहे,’ असे चाकणकर यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही या गोष्टींचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी वापर करून फोटो, व्हिडीओ, चित्रपट, रील्स, टीझर, प्रमोशनल साहित्य अथवा अन्य कोणतीही सामग्री तयार केली, वापरली किंवा प्रसिद्ध केली, तर संबंधित व्यक्तीविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.



अशा प्रकारचे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य आढळल्यास ते जप्त करण्याची मागणी केली जाईल. तसेच संबंधितांना फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाच्या कायदेशीर कारवाईसह शिक्षेलाही सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही चाकणकर यांनी दिला आहे.



दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. या प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या ट्रेडमार्क नोंदणीच्या घोषणेकडे लक्ष वेधले जात आहे.