मुंबई
Sonakshi Sinha बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर दिल्लीतील एका तरुणाला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याच्या अटकेदरम्यान आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नसल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबईतील न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवली आणि आरोपीच्या सुटकेचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील एका व्यक्तीने तिचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप तिने केला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजून ११ मिनिटांनी दिल्लीतील शाहदरा परिसरातील जगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आर्यन दीपक जैन याला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी त्याला मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी वांद्रे पोलिसांनी आरोपीच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. अभिनेत्रीचे कथित अश्लील फोटो तयार करण्यासाठी कोणत्या माध्यमाचा किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करण्यात आला, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच या प्रकरणातील अन्य बाबींचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपीला दिल्लीहून मुंबईत आणण्यापूर्वी तेथील जवळच्या स्थानिक दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले नव्हते. याच मुद्द्यावर न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदवला.
आरोपीला थेट दिल्लीहून मुंबईतील न्यायालयात आणण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यापूर्वी दिल्लीतील सक्षम दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्याची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही, असे निरीक्षण दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. ही प्रक्रिया का टाळण्यात आली, याबाबत तपास यंत्रणेकडून कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण किंवा ठोस कारण न्यायालयासमोर मांडण्यात आले नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, आरोपीच्या वतीने वकील अमन शाही, प्रशांत त्रिवेदी आणि आदित्य जैन यांनी पोलिसांच्या कोठडीच्या मागणीला विरोध केला. अटक करण्यापूर्वी आरोपीला आवश्यक नोटीस देण्यात आली नव्हती आणि अटकेचे कारणही स्पष्ट करण्यात आले नव्हते, असा दावा बचाव पक्षाने केला. आरोपीला अत्यंत गोपनीय पद्धतीने विमानाने दिल्लीच्या हद्दीबाहेर नेण्यात आल्याचा आरोपही वकिलांनी केला. कायद्यानुसार दिल्लीतील स्थानिक दंडाधिकारी न्यायालयासमोर आरोपीला प्रथम हजर करणे आवश्यक होते. मात्र, या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यात आले. तक्रारदार व्यक्ती प्रभावशाली असल्यामुळे पोलिसांनी घाईघाईने ही कारवाई केल्याचा आरोपही बचाव पक्षाने न्यायालयात केला. आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नसून, प्रथमदर्शनी प्रकरणात लावण्यात आलेली कलमेही लागू होत नसल्याचा दावा वकिलांनी केला.
अटकेच्या प्रक्रियेबाबत न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात बीएनएसएसच्या कलम ३५(१)(ब) चा संदर्भ दिला. आरोपीवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये कमाल सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याने अटक करताना पोलिसांना या कलमातील आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीला अटक करण्याची गरज का आहे, याची कारणे संबंधित अधिकाऱ्याने नोंदवणेही आवश्यक असते. मात्र, उपलब्ध कागदपत्रांवरून तपास अधिकाऱ्याने या कायदेशीर तरतुदींचे समाधानकारक पालन केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
केवळ पुढील तपास करायचा आहे, या कारणावरून एखाद्या व्यक्तीला अटक करून कोठडीत ठेवता येणार नाही. विशेषतः अटकेसंदर्भातील अनिवार्य कायदेशीर नियमांचे पालनच झाले नसेल, तर अशा कारवाईचे समर्थन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, आर्यन दीपक जैन याची अटक बेकायदेशीर ठरवत त्याला सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटो प्रकरणात आता पुढील तपास कोणत्या दिशेने जातो आणि पोलिसांकडून या प्रकरणात कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.